विलासरावांसाठी एका व्यासपीठावर
By Admin | Updated: March 15, 2015 02:26 IST2015-03-15T02:26:11+5:302015-03-15T02:26:11+5:30
निवडणुकीत एकमेकांवर घणाघाती आरोप करून विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे सर्वपक्षीय राजकीय नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासाठी मतभेद विसरून ...

विलासरावांसाठी एका व्यासपीठावर
नागपूर : निवडणुकीत एकमेकांवर घणाघाती आरोप करून विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे सर्वपक्षीय राजकीय नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासाठी मतभेद विसरून एका व्यासपीठावर येण्याचा योग शनिवारी जुळून आला. श्रीराम ग्राम विकास शिक्षण संस्थेच्या रजत महोत्सवानिमित्ताने मौदा येथील श्रीमती राजकमल बाबूराव तिडके महाविद्यालयात देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण सर्वांच्या उपस्थितीत पार पडले. यानिमित्ताने नेत्यांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगली.
माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्त्ो पुतळ््याचे अनावरण करण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री अनिल देशमुख, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री मधुकर किंमतकर, अनिस अहमद, सुलेखा कुंभारे व बाबूराव तिडके यांच्यासह आजी-माजी आमदार व्यासपीठावर होते.
विलासराव राजकारणातून समाजकारणावर छाप पाडणारे नेते होते. त्यांच्यात निर्णयक्षमता होती. प्रशासनावर पकड होती. राज्याच्या विकासासाठी त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यावेळी विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून टीका करीत होतो. परंतु वैयक्तिक शत्रुत्व नव्हते. वेगवेगळ्या पक्षात राहूनही आमचे संंबंध चांगले होते, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांचा राज्याच्या विकासात मोठा वाटा आहे. मतभिन्नता, मतभेद स्वाभाविक आहेत. परंतु मनभेद नको. विलासराव लोकनेते होते. महाराष्ट्र त्यांच्या कार्याला विसरणार काही. ज्याची सत्ता आली त्या पक्षात जाऊ, अशी प्रवृत्ती असेल तर लोकशाही प्रगल्भ होणार नाही. ग्रामीण व कृषी क्षेत्राची स्थिती चांगली नाही. साखर कारखाने अडचणीत आहेत. यातून सावरण्यासाठी कृषी क्षेत्राची नव्याने मांडणी करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ सहकारी म्हणून विलासरावांच्या सान्निध्यात काम करण्याचा योग आला. दिलखुलास असे व्यक्तिमत्त्व होते. विदर्भ, मराठवाड्याला न्याय मिळावा अशीच त्यांची भूमिका होती. गडकरी व मी एका व्यासपीठावर आलो म्हणून लोकांना वाटेल ‘मॅच फिक्सिंग’ आहे. परंतु पक्षाच्या पलीकडे व्यक्तिगत संबंधातून काही चांगले व्हावे, यासाठी संवादाची गरज असल्याचे प्रतिपादन अशोक चव्हाण यांनी केले. राजकीय पक्षाची भूमिका घेतली पाहिजे. विचारसरणी वेगवेगळी राहू शकते. पण देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाच प्रश्न येईल तेव्हा सहकार्याची भूमिका असली पाहिजे. यासाठी विरोधी पक्ष म्हणून सकारात्मक भूमिका घेऊ .
आज विलासराव देशमुख असते तर महाराष्ट्राचा विकास अधिक जोमाने झाला असता. कामठी मतदार संघाच्या विकासासाठी निधी मागताना त्यांनी व अशोक चव्हाणांनी कधी परत केले नाही. विकासात त्यांचा वाटा असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. कृपाल तुमाने, राजेंद्र मुळक यांनीही विलासरावांच्या कार्यावर प्रकाश टाकला. विलासराव गेल्याने पक्षाची मोठी हानी झाली. त्यांच्यासारख्या प्रेम करणाऱ्या नेत्यांची आज खरी गरज होती, असे प्रतिपादन बाबूराव तिडके यांनी प्रास्तविकातून केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी तर आभार प्रसन्ना तिडके यांनी मानले. व्यासपीठावर जिल्हा काँग्रेस क मिटीच्या अध्यक्ष सुनिता गावंडे, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार यादवराव देवगडे, देवराव रडके, अशोक धवड, एस. क्यू. जामा, शौकत कुरेशी, अनंतराव घारड, सदानंद निमकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, प्राचार्य विनोद गावंडे, प्रसन्ना तिडके आदी उपस्थित होते. प्रारंभी गडकरी व चव्हाण यांच्याहस्ते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रा. म.व. मेश्राम यांनी बाबूराव तिडके यांच्यावर लिहिलेल्या ‘क्रांती स्वप्न’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्र माला सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
बाबूरावांनी मैत्रीधर्म पाळला
आपल्यासोबत कुणी वाईट वागले म्हणून आपणही तसे वागू नये. निवडणूक संपली की सर्व विसरायला हवे. अडचणीच्या काळात जे सोबतीला असतात, तेच खरे मित्र. बाबूरावांनी विलासरावांचा पुतळा उभारून मैत्रीधर्म पाळला, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.
‘अच्छे दिन’ची
जबाबदारी गडकरींची
विमा क्षेत्रात खासगी सहभागाला आम्ही पाठिंबा दिला. पण विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. खरीप, रबी हंगाम बुडाला असून अजूनही गारपीट सुरूच आहे. आता शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आणण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांची आहे. युपीए सरकारने शेतकऱ्यांना बँक कर्जमाफी देण्याची भूमिका घेतली होती. आता तशीच भूमिका भाजपने घ्यावी, असे मत चव्हाण यांनी मांडले.