५०० अतिगंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:33 PM2020-06-13T12:33:30+5:302020-06-13T12:35:46+5:30

वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे.

Plasma therapy on 500 critically ill patients | ५०० अतिगंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी

५०० अतिगंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी

Next
ठळक मुद्देजगात पहिल्यांदाच ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ चाचणीमेडिकलकडे जबाबदारी

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोविड-१९’वर जगात कोणतेही अँटि-व्हायरल उपचार उपलब्ध नाहीत. या भीषण परिस्थिीत रुग्णाचा उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उम्मेद जागविली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे. यात गंभीर लक्षणे असलेल्या ५०० कोविडच्या रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे.
जगात एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांवर व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णावर पहिल्यांदाच चाचणी होणार आहे. याची जबाबदारी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे सोपविण्यात आली आहे. राज्यात कोविड-१९ची ९०,७८७ प्रकरणे तर ३,२८९ मृत्यू आहेत. जवळपास १५ टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरतीची आवश्यकता आहे आणि सुमारे ५ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सचिव डॉ. संजय मुखर्जी व संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ चाचणी राबविण्यास पुढाकार घेतला आहे.
विशेष म्हणजे, ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) वतीने देशातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘प्लाझ्मा थेरपी’ चाचणीवर संशोधन सुरू आहे. परंतु ही चाचणी मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर आहे. यातही साधारण २५० रुग्णांचा समावेश केला जाणार आहे. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चाचणीमध्ये ५०० गंभीर रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. यात राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ही चाचणी केली जाणार आहे.

डॉ. मित्रा यांच्या मार्गदर्शनात पथक
डॉ. संजय मुखर्जी व डॉ. लहाने यांनी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ची जबाबदारी नागपूरच्या मेडिकलवर सोपविली आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करण्यात आले आहे. यात पल्मोनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम हे या चाचणीचे प्रमुख अन्वेषक आणि संयोजक आहेत. आर्थाेपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. मो. फैजल हे राज्य नोडल अधिकारी व प्रभारी अधिकारी आहेत.

बरे होण्याचा दर व मृत्यूदराचे निरीक्षण
राज्यातील साधारण २३ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५०० गंभीर रुग्णांवर ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ चाचणी केली जाणार आहे. या सर्वांचा डाटा नागपूर मेडिकल गोळा करून बरे होण्यचा दर व मृत्यूदरावर निरीक्षण करणार आहे. याचे डाक्युमेन्टेशन तयार केले जाईल. त्यापूर्वी या प्रकल्पासाठी आवश्यक दस्तावेज विविध संस्थांची मंजुरी घेतली जात असून ती अंतिम टप्प्यात आहे.

काय आहे चाचणी
यात कोविडमधून बरा होऊन २८ दिवस कुठलीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीच्या रक्तामधून प्लाझ्मा घेतले जाणार आहे. अशा व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अ‍ॅन्टीबॉडीज मुबलक असतात. हे अ‍ॅन्टीबॉडीज गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यास रुग्णाचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढते. म्हणून कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, त्या व्यक्तीचा रक्तातील प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिला जाण्यावरील हे संशोधन आहे.

‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ ही जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी चाचणी असेल. मोठ्या संख्येत जीव वाचविण्यास मदत करेल. ही उपचार पद्धती पूर्णत: नि:शुल्क आहे.-डॉ. संजीव मुखर्जी सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग कोट...ही चाचणी प्लाझ्माच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास मदत करेल. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये या प्रकल्पाचे मार्गदर्शक असतील.
-डॉ. तात्याराव लहाने संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

Web Title: Plasma therapy on 500 critically ill patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य