तीर्थदर्शन योजनेतील भाविकाचा बिहारमध्ये भीषण अपघात; पत्नी बचावली, पती कोमात, पाटणाच्या एम्समध्ये उपचार सुरू
By नरेश डोंगरे | Updated: February 9, 2025 20:22 IST2025-02-09T20:22:21+5:302025-02-09T20:22:53+5:30
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ५ फेब्रुवारीला २३७ भाविक स्पेशल ट्रेनने नागपूर रेल्वे स्थानकावरून बुद्ध गयेकडे निघाले होते.

तीर्थदर्शन योजनेतील भाविकाचा बिहारमध्ये भीषण अपघात; पत्नी बचावली, पती कोमात, पाटणाच्या एम्समध्ये उपचार सुरू
नागपूर : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बिहारच्या बुद्धगया येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांपैकी विदर्भातील सहा जणांचा अपघात झाला. त्यात नागपुरातील अशोक ढाबरे यांना गंभीर दुखापत झाल्याने ते कोमात गेले असून, त्यांच्यावर पाटणा (बिहार) मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची पत्नी माया ढाबरे आणि अन्य चार जण मात्र या अपघातात थोडक्यात बचावले आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ५ फेब्रुवारीला २३७ भाविक स्पेशल ट्रेनने नागपूर रेल्वे स्थानकावरून बुद्ध गयेकडे निघाले होते. ७ फेब्रुवारीला सकाळी गयेपासून काही अंतरावर पोहोचल्यानंतर ही मंडळी फ्रेश झाली आणि आपापल्या सुविधेनुसार दर्शनस्थळाकडे निघाली. येथील महापुष्प सोसायटीत राहणारे अशोक ढाबरे, त्यांची पत्नी माया आणि अन्य चार असे सहा जण ऑटोत बसून दुपारी ३ च्या सुमारास बुद्धगयेकडे जात असताना चालकाच्या हलगर्जीपणामुळे भरधाव ऑटो उलटून खड्ड्यात पडला. परिणामी सहाही प्रवासी जखमी झाले. ढाबरे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे त्यांना तेथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डॉक्टरांनी एम्समध्ये हलविले. तेथे त्यांना दाखल करून घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला. तब्बल सात तास ते तसेच पडून राहिले. ही माहिती कळताच समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, नागपुरातील भाजपा नगरसेवक संदीप गवई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांच्या माध्यमातून पाटणा एम्सच्या वरिष्ठांशी संपर्क केला. त्यानंतर मध्यरात्री ढाबरे यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. मात्र, तोपर्यंत ढाबरे कोमात गेले होते.
--------------
एअर ॲम्बुलन्ससाठी कुटुंबीयांचा टाहो
या अपघाताची माहिती मिळताच ढाबरे यांची दोन्ही मुले आपल्या मित्रांसह पाटणा येथे पोहोचली. घरापासून शेकडो किलोमीटर दूर, वेगळा प्रांत, अनोळखी लोक, अशांमध्ये ढाबरे कुटुंबीयांची फरफट सुरू आहे. प्रकृती चिंताजनक असूनही येथे पाहिजे तसे उपचार मिळत नसल्याची तक्रारवजा माहिती ढाबरे कुटुंंबीयांनी पाटणा येथून लोकमतशी बोलताना दिली. अशोक ढाबरे यांना एअर ॲम्बुल्सनने नागपुरातील एम्समध्ये हलवावे, अशी आर्त मागणीही त्यांनी केली आहे.
----------------
संबंधित वर्तुळात खळबळ
या अपघाताने संबंधित वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या संबंधाने समाज कल्याणच्या सहायक आयुक्त तेलगोटे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी पीडित कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्याचे सांगितले. तेथे त्यांना उपचारासाठी किंवा राहण्या-खाण्यासाठी खर्च येणार नाही, याची तजवीज करण्यात आली. त्यांच्या मदतीसाठी विभागातील दोन व्यक्तींना रवाना करण्यात आल्याचेही सांगितले. ढाबरे यांना एअर ॲम्बुलन्सने हलविण्याबाबत विचारले असता, समाजकल्याणमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या संबंधित वरिष्ठांच्या आपण संपर्कात असल्याचेही तेलगोटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.