पाषाणावर साकारले मुख्यमंत्र्यांचे चित्र
By Admin | Updated: August 10, 2015 02:46 IST2015-08-10T02:46:05+5:302015-08-10T02:46:05+5:30
‘पाषाणचित्र’ लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ...

पाषाणावर साकारले मुख्यमंत्र्यांचे चित्र
प्रमोदबाबू रामटेके यांची कलाकृती : विजय दर्डा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना भेट
नागपूर : प्रसिद्ध चित्रकार प्रमोदबाबू रामटेके यांनी पाषाणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चित्र साकारले आहे. संबंधित ‘पाषाणचित्र’ लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिले. प्रमोदबाबू यांनी ‘अॅक्रेलिक’रंगाचा वापर करून ही कलाकृती साकारली असून, जगात पहिल्यांदाच पाषाणावर असे चित्र साकारण्यात आले आहे.
प्रमोदबाबू यांनी मुख्यमंत्र्यांचे चित्र साकारलेला पाषाण ओबडधोबड व नैसर्गिक अवस्थेत आढळलेला आहे. त्या पाषाणाला हाताने किंवा इतर साहित्याने कोरून कुठलाही आकार दिलेला नाही. प्रमोदबाबूंनी काढलेल्या अशाप्रकारच्या कलाकृतीचे प्रदर्शनही नुकतेच नागपुरात आयोजित करण्यात आले होते. अशाप्रकारे पाषाणावर काढलेल्या चित्रांचे हे जगातील पहिलेच प्रदर्शन होते.
खा. दर्डा यांनी संबधित कलाकृती मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या; सोबतच प्रमोदबाबू यांची मुख्यमंत्र्यांशी ओळख करून दिली व त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कामाची माहितीही दिली. संबंधित पाषाणावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विजयी मुद्रेतील हसमुख चित्र काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस स्वत:चे पाषाणचित्र पाहून थक्क झाले. त्यांनी दिलखुलासपणे या कलाकृतीची प्रशंसा केली व उपस्थितांसह या कलाकृतीच्या मागे उभे राहून विजयी मुद्रेची पोज देत छायाचित्र काढले. यावेळी दिलीप छाजेड व बिपीन सुळे उपस्थित होते.
भेटीनंतर लोकमत प्रतिनिधीने मुख्यमंत्र्यांचेच पाषाणचित्र का काढावेसे वाटले, असे प्रमोदबाबूंना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील ‘रॉक पर्सनॅलिटी’ आहेत; शिवाय नागपूरची व्यक्ती पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्याचा प्रत्येक नागपूरकराला अभिमान आहे. त्यामुळेच आपण पाषाणावरील चित्र काढण्यासाठी त्यांची निवड केली. (प्रतिनिधी)
कोण आहेत प्रमोदबाबू?
प्रमोदबाबू रामटेके हे जे.जे. स्कूल आॅफ आर्टचे अध्यापक होते. लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सच्या संचालकांनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांचे चित्र काढण्यासाठी चित्रकाराचा शोध घेण्यासाठी एक चमू भारतात पाठविली होती. या चमूने रिसर्च करून प्रमोदबाबू यांची निवड केली. राष्ट्रपतींचे पाहुणे म्हणून प्रमोदबाबू हे चार दिवस राष्ट्रपतीभवनात राहिले. राष्ट्रपती नारायणन यांच्यासमोर बसून त्यांनी त्यांचे चित्र काढले. संबंधित चित्र लंडनला नेऊन लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये लावण्यात आले आहे.