युपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीचा फोननंबर कॉलगर्ल म्हणून व्हायरल
By योगेश पांडे | Updated: August 2, 2024 17:27 IST2024-08-02T17:26:38+5:302024-08-02T17:27:14+5:30
Nagpur : दिल्लीतील आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Phone number of UPSC preparing girl goes viral as call girl
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युपीएससीची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा मोबाईल विविध व्हॉट्सअप ग्रुपवर चक्क कॉलगर्लचा मोबाईल क्रमांक असल्याची बतावणी करत तिची बदनामी करण्यात आली. दिल्लीत तिच्यासोबतच अभ्यास करणाऱ्या तरुणाने हे काम केले.
संबंधित तरुणी काही महिन्यांसाठी दिल्लीत युपीएससीच्या अभ्यासासाठी गेली होती. त्यानंतर ती नागपुरात परतली. दिल्लीत असताना तिची विकास वर्मा नावाच्या तरुणाशी तोंडओळख झाली होती. तोदेखील दिल्लीत युपीएससीची तयारी करत होता. त्याने एका मुलाचे तिच्यावर प्रेम असल्याचेदेखील सांगितले होते. काही दिवसांअगोदर एका अज्ञात नंबरवरून तिला फोन आला व हा कॉलगर्लचा क्रमांक आहे का अशी विचारणा केली. तरुणीला हे ऐकून धक्काच बसला. त्यानंतर तिला काही दिवसांत अशा पद्धतीचे अनेक फोन आले. अखेर तिने एका कॉलरला विश्वासात घेऊन हा क्रमांक कुठून मिळाला अशी विचारणा केली. समोरील व्यक्तीने तिचा क्रमांक ८२८७९३१२०५ या क्रमांकाच्या फोनधारकाने एका ग्रुपमध्ये शेअर केल्याचे सांगितले व तसा स्क्रीनशॉटदेखील पाठविला. तरुणीने लगेच सायबर पोलिसांकडे धाव घेतली. तेथे संबंधित फोनचे तपशील काढले असता तो विकास पटेल वर्मा याच्या नावावर नोंद असल्याची बाब समोर आली. तरुणीने टेलिग्रामवरून त्याचा फोटो तपासला असता तो तिच्या ओळखीचाच विकास वर्मा निघाला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ व ७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.