उपराजधानीत वाढताहेत ‘पर्शियन कॅट लव्हर’
By Admin | Updated: August 8, 2015 02:53 IST2015-08-08T02:53:56+5:302015-08-08T02:53:56+5:30
मांजर पाळण्याचा छंद अनेक वर्षांपासून अनेक जण जोपासतात. काळाच्या ओघात आता हा छंद ग्लोबल झाला आहे.

उपराजधानीत वाढताहेत ‘पर्शियन कॅट लव्हर’
आज ‘वर्ल्ड कॅट डे’ : ५० हजारापर्यंतच्या मांजरी पाळतात शौकिन
दयानंद पाईकराव नागपूर
मांजर पाळण्याचा छंद अनेक वर्षांपासून अनेक जण जोपासतात. काळाच्या ओघात आता हा छंद ग्लोबल झाला आहे. होय, देशी मांजर पाळणारे नागपूरकर आता विदेशातून मांजर बोलवित आहेत. यात ‘पर्शियन कॅट’ला विशेष मागणी असून विदेशी मांजर घरात आणण्यासाठी उपराजधानीतील शौकिनांनी ६ ते ५० हजार रुपये खर्च केले आहेत. आजमितीस नागपुरात तब्बल ७० ते ७५ पर्शियन कॅट पाळण्यात येत आहेत.
पाळीव मांजरीला घरातील सदस्यासारखी वागणूक मिळते. त्यांची खाण्यापिण्याची भांडी, झोपण्याची जागा ठरविलेली असते. लहान मुलांना या मांजरीबद्दल विशेष आकर्षण असल्यामुळे अनेकजण घरी मांजर पाळतात. अलिकडच्या काळात विदेशातील मांजर पाळण्याची पद्धत नागपुरात रूढ होत आहे. सध्या नागपुरात देशी ६०० पाळीव मांजरी, १५०० मोकाट फिरणाऱ्या मांजरी तर विदेशातून बोलावलेल्या ७० ते ७५ मांजरी असल्याची माहिती छत्रपतीनगर येथील शिवहरी अपार्टमेंटमधील डॉग, कॅट, बर्ड क्लिनिकचे व्हेटरनरी सर्जन हेमंत जैन यांनी दिली. जगातील एकूण मांजरांपैकी ५३ टक्के मांजर पाळीव आहेत. घरी राहत असल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वागणुकीत बदल घडून येतो. या उलट पाळीव नसलेली देशीमांजर आक्रमक असते. पाळीव मांजरांमध्ये जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. अमेरिकेतील ५८ टक्के मांजरी लठ्ठ आहेत. इतर देशातील मांजरीमध्ये ३० ते ४० टक्के लठ्ठपणा आढळतो. लठ्ठपणामुळे मांजरांना मधुमेह, त्वचेचे आजार, हाड, सांधेदुखी, मूत्रविकार जडून त्यांचे वयोमान कमी होते. साधारणत: एक मांजर १२ ते १५ वर्षाचे आयुष्य जगते. परंतु अमेरिकेत ३८ वर्षे मांजर जगल्याचा विक्रम असल्याची माहिती डॉ. हेमंत जैन यांनी दिली. मांजर आपल्या घराभोवती ५०० मिटरची जागा तयार करते. या जागेत तिचा वावर राहतो. मांजरीला ३० दात असतात. परंतु तिला आंबट, गोड, तिखट अशी चव कळत नाही. माणसापेक्षा पाच पट अधिक हायड्रोक्लोरिक अॅसिड मांजरीच्या पोटात असते. यामुळे मांस पचविणे त्यांना सहज शक्य होते.
मांजर स्वत: आपले केस चाटत असते. यामुळे तिचे केस पोटात जाऊन त्याचा हेअरबॉल तयार होऊन मांजरीचा मृत्यू होऊ शकतो. त्यासाठी मांजरीला नियमित ब्रश करणे, सलाद, कॅट फूड आणि हेअरबॉल होऊ नये म्हणून हेअरबॉल रिमुव्हल फॉर्म्युला देणे गरजेचे असते. याशिवाय मांजरीच्या विष्ठेपासून महिलांना आजार जडत असल्यामुळे दर महिन्यात मांजरीला जंताचे औषध देणे गरजेचे ठरते.
मांजरासाठी ३ ते ५ हजार रुपयांचे ‘कॅट फूड’ विकत घेणारे शौकिनही नागपुरात असून सर्वजण नियमित आपल्या लाडक्या ‘कॅट’ची आवर्जून देखभाल करतात.
मांजर देते स्वच्छतेला महत्त्व
पाळीव मांजर घरात कधीच घाण करीत नाही. आपण राहत असलेली जागा आणि आपले शरीर नेहमी स्वच्छ ठेवते. शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी एक मांजर दिवसातील ३० टक्के वेळ खर्च करते. मांजरीने बाहेर विष्ठा केली तरीसुद्धा ती पायाने माती उकरून त्यावर माती टाकते.
विषबाधेमुळे सर्वाधिक मांजरींचा मृत्यू
जगातील सर्वाधिक मांजरींचा मृत्यू विषबाधेमुळे होतो. विष टाकून मारलेले उंदीर मांजर खात असल्यामुळे त्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय जगात सर्वात अधिक नागरिकांचा मृत्यूही मांजर चावल्यामुळे झाल्याची नोंद आहे. त्यासाठी मांजरांना नियमित रॅबीज, हायड्रोफोबियाची लस देणे गरजेचे असते.