नागद्वार यात्रेला २३ जुलैपासून परवानगी; गडकरींचा पुढाकार, मध्य प्रदेश शासनाने वाढवला यात्रेचा कालावधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 15:25 IST2022-06-30T15:22:01+5:302022-06-30T15:25:02+5:30
गडकरी यांच्या मध्यस्थीनंतर आता यात्रेचा कालावधी २३ जुलै ते ३ ऑगस्ट करण्यात आला आहे. या यात्रेत १० लाखांहून अधिक भाविक दरवर्षी सहभागी होत असतात. नागपूर-विदर्भातून लाखोंच्या संख्येत भाविक या यात्रेसाठी जात असतात.

नागद्वार यात्रेला २३ जुलैपासून परवानगी; गडकरींचा पुढाकार, मध्य प्रदेश शासनाने वाढवला यात्रेचा कालावधी
नागपूर : नियोजित कार्यक्रमानुसार नागद्वार येथील यात्रा २५ जुलैपासून सुरू होणार होती. मात्र, विविध संघटनांनी मागणी केल्याने आता यात्रेला २३ जुलैपासून परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात नर्मदापुरम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नीरजकुमार सिंह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला पत्र पाठविले आहे. गडकरी यांनी विविध संघटनांची मागणी लक्षात घेता हा मुद्दा मध्य प्रदेश सरकारसमोर मांडला होता.
कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा होऊ शकली नाही. यंदा या यात्रेत दरवर्षीपेक्षा अधिक भाविक सहभागी होऊ शकतात. हे लक्षात मध्य प्रदेश प्रशासनाला यात्रेचा कालावधी वाढविण्याची विनंती करण्यात आली होती. पद्मशेष (नागद्वार) सेवा मंडळ नागपूर, श्री क्षेत्र अंबामाता (पद्मशेष) सेवा मंडळ नागपूर, श्री राज राजेश्वर लंगर सेवा मंडळ पचमढी या संघटनांचे शिष्टमंडळ गडकरी यांना भेटले होते. त्यांनी निवेदन देऊन यात्रेच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी केली होती.
यंदा ही यात्रा २५ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत निर्धारित करण्यात आली होती. गडकरी यांच्या मध्यस्थीनंतर आता यात्रेचा कालावधी २३ जुलै ते ३ ऑगस्ट करण्यात आला आहे. या यात्रेत १० लाखांहून अधिक भाविक दरवर्षी सहभागी होत असतात. नागपूर-विदर्भातून लाखोंच्या संख्येत भाविक या यात्रेसाठी जात असतात.