बुद्धाच्या तत्त्वज्ञानातूनच जगात शांतता
By Admin | Updated: October 3, 2014 02:52 IST2014-10-03T02:52:42+5:302014-10-03T02:52:42+5:30
सध्या जगभरात अशांततेचे वातावरण पसरले आहे. धर्माच्या, श्रेष्ठत्वाच्या नावावर हा प्रकार सुरूअसून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शांतता ....

बुद्धाच्या तत्त्वज्ञानातूनच जगात शांतता
नागपूर : सध्या जगभरात अशांततेचे वातावरण पसरले आहे. धर्माच्या, श्रेष्ठत्वाच्या नावावर हा प्रकार सुरूअसून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर खऱ्या अर्थाने बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची गरज आहे, असे प्रतिपादन भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी येथे केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त दीक्षाभूमीवर जागतिक धम्मपरिषद आयोजित करण्यात आली होती. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. भंते सुरेई ससाई म्हणाले, तथागत गौतम बुद्धांनी अहिंसा व मानवतेची शिकवण दिली आहे. आंबेडकरी बौद्ध अनुयायी हे त्यांच्या शिकवणीनुसारच चालत असून त्याद्वारेच त्यांचा विकास झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि या देशातून जवळपास हद्दपार झालेला धम्म नव्याने पुनर्जीवित झाला. ज्या ठिकाणी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली ते पवित्र स्थळ आज दीक्षाभूमी या नावाने जगात ओळखले जाते. तथागत गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण मागील ५८ वर्षांपासून दीक्षाभूमीवरून देशातील कानाकोपऱ्यात आणि विदेशात पोहोचत असल्याने दीक्षाभूमी ही खऱ्या अर्थाने आधुनिक भारताची तक्षशिला होय, असेही त्यांनी स्पष्ट केले. सदानंद फुलझेले यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात दीक्षाभूमीवर आलेल्या देश-विदेशातील बौद्ध आंबेडकरी अनुयायांचे स्वागत केले. तसेच गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार आम्ही चालत राहू, असा आशावाद व्यक्त केला. सर्वप्रथम बुद्ध वंदनेने परिषदेला सुरुवात झाली.
थायलंड येथून ३८ लोकांचे एक प्रतिनिधी मंडळ या कार्यक्रमासाठी विशेषत्वाने उपस्थित होते. डॉ. रंगथिप चोटनापलाई, पटछाया फट्टाराचैरॉन, सियारट फोटीबुसायावट, चुटीमा अनंथराप्रयून, रविवान थिरावल, नफाटसोर्न फाटसोर्नपियासक, पीमलाडा पट्टनावोंगकित्ती, फ्रामाहा विनीत फारचरून, फेरा साकोर्न वाट्टाना, रविवान खंजानाविसीट्टाफोल, वान्ना वाटचरसक्त्रकुल, सुकिटा सुकपुन्टावी, चनाटदा लोईखाओफोंग, नीड लाओपोंगसोर्न, नारीत बैंगम, नारीलूक सुत्तीरुत, जरुनान मोंगक्लाकोर्न, रविवान ओराओन, जंतना डुंगमानी, डुट्साडीफट रोतखाजोर्नवानीत, मानाफाथ्थाना रोतखाजोर्नवानीत, सुत्तीमोन चैहोउदजारोईन, अरुणी ओ-चारोईन, प्राणी चिरानानॉन, जीरावार्ड थुंगसुत्तरानॉनकुल, नुतचानून आदींचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य सर्वश्री विजय चिकाटे, अॅड. आनंद फुलझेले, डॉ. सुधीश फुलझेले, विलास गजघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.