लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बिघडलेला मोटर पंप बदलवून देण्यास विलंब केल्यामुळे तक्रारकर्त्या शेतकऱ्याला शारीरिक मानसिक त्रासाकरिता ५ हजार व तक्रार खर्चाकरिता २ हजार अशी एकूण ७ हजार रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम पॉलिमर्स इंडिया कंपनीला दिला. मंचच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी ही तक्रार निकाली काढली.बबन तुळशीराम उराडे असे तक्रारकर्त्या शेतकऱ्याचे नाव असून ते भंडारा येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, उराडे यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मौदा पंचायत समितीमार्फत मोटर पंप वाटप करण्यात आला होता. तो मोटर पंप श्रीराम पॉलिमर्स इंडिया कंपनीकडून खरेदी करण्यात आला होता. उराडे यांनी त्या मोटर पंपकरिता ९ हजार ५०० रुपये अदा केले होते. तो मोटर पंप वॉरन्टी काळात २७ मे २०१८ रोजी बंद पडला. उराडे यांनी त्यासंदर्भात तक्रारी केल्या, पण त्यांना मोटर पंप बदलवून देण्यात आला नाही. तसेच, त्यांची रक्कमही परत देण्यात आली नाही. दरम्यान, त्यांच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी, त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल करून मोटर पंपची रक्कम व भरपाई मिळण्याची मागणी केली होती. ही तक्रार प्रलंबित असताना उराडे यांना नवीन मोटर पंप देण्यात आला. त्यामुळे मंचने उराडे यांना केवळ भरपाई मंजूर केली.सेवेत त्रुटी ठेवलीउराडे यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना ताबडतोब मोटर पंप बदलवून देणे आवश्यक होते. परंतु, त्यांना मंचमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर नवीन मोटर पंप देण्यात आला. ही कंपनीच्या सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे उराडे यांना शारीरिक-मानसिक त्रास सहन करावा लागला असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.
शेतकऱ्याला सात हजार रुपये भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 23:56 IST
बिघडलेला मोटर पंप बदलवून देण्यास विलंब केल्यामुळे तक्रारकर्त्या शेतकऱ्याला शारीरिक मानसिक त्रासाकरिता ५ हजार व तक्रार खर्चाकरिता २ हजार अशी एकूण ७ हजार रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम पॉलिमर्स इंडिया कंपनीला दिला.
शेतकऱ्याला सात हजार रुपये भरपाई द्या
ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा आदेश