ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक पवार करणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे
By कमलेश वानखेडे | Updated: August 23, 2024 19:22 IST2024-08-23T19:19:41+5:302024-08-23T19:22:55+5:30
सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा पवारांचा मनसुबा : चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Pawar will not make the mistake of making Thackeray Chief Minister: Chandrasekhar Bawankule
नागपूर : मुख्यमंत्री होता यावे यासाठी उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीची साथ सोडू शकतात. तर ते आपल्या पाठीत केव्हाही पाठीत खंजीर खुपसू शकतात हे शरद पवारांना माहिती आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची कधीही चूक करणार नाहीत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस व शरद पवार गटाच्या जाळ्यात फसले आहेत. त्यांना मुख्यमंत्री करणे हा केवळ एक खेळ होता. कॉंग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदासाठी डोक्याला बाशिंग बांधून आहेत, कॉंग्रेसचे इतरही नेते इच्छुक आहेत. सोबतच सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा मनसुबा शरद पवारांचा आहे. यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी याचना करीत आहेत. महाविकास आघाडीत प्रचंड असंतोष पसरला आहे. अमित शहा यांच्या नावावर जसा खोटारडेपणा उद्धव ठाकरेंनी केला तसाच खोटारडेपणा ते शरद पवारांच्या नावाने करतील. मुख्यमंत्री पद मिळविण्याकरिता उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते, पण त्यांना तेथून फेटाळून लावले, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
सात दिवसात जागावाटपाची चर्चा पूर्ण व्हावी
महायुतीमधील तिन्ही नेत्यांनी एकत्र येत आगामी सात दिवसात जागावाटपाबाबत चर्चा पूर्ण करावी, अशी भाजपची मागणी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी फार काळ उरलेला नाही. तिन्ही पक्ष महायुतीमध्ये लढणार असून इतर अकरा घटक पक्षांचाही विचार व्हावा. सिटिंग गेटिंगचा विचार सुरू आहे, तथापि, कोणत्याही सूचना अद्याप देण्यात आलेल्या नाहीत. सिटिंग गेटिंग मध्येही काही फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली. प्राथमिक स्तरावर स्थानिक स्तरावरच निर्णय होतात अंतिम निर्णय मात्र केंद्रीय नेतृत्त्व घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीमध्ये कागलची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटणार आहे. समरजीत घाडगे यांना लढायचेच असेल तर त्यांना कोण थांबविणार, असेही त्यांनी सांगितले.