रक्त घटकांअभावी रुग्णांचा जीव टांगणीला

By Admin | Updated: November 7, 2015 03:12 IST2015-11-07T03:12:41+5:302015-11-07T03:12:41+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रक्तघटक वेगळे करणारी यंत्रणा असली तरी दर्जा नियंत्रणासाठी ....

Patients die due to blood components | रक्त घटकांअभावी रुग्णांचा जीव टांगणीला

रक्त घटकांअभावी रुग्णांचा जीव टांगणीला

मेडिकलमध्ये मशीन स्थापन करण्यास उशीर : तर ‘एफडीए’ला हवे स्थापनेचे पत्र
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रक्तघटक वेगळे करणारी यंत्रणा असली तरी दर्जा नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याच्या कारणावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीएने) ‘होल ब्लड’ला परवानगी देत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ला परवानगी नाकारली आहे. याला आता आठ दिवसांचा कालावधी होत आहे. विशेष म्हणजे मेडिकलच्या आदर्श रक्तपेढीत सोमवारी तीन आवश्यक मशीन आल्या, परंतु चार दिवस होऊन त्या स्थापना झाल्या नाहीत. दुसरीकडे जोपर्यंत स्थापनेचे पत्र मिळत नाही तोपर्यंत मंजुरी देणार नाही, अशी आडमुठेपणाची भूमिका एफडीएने घेतल्याने सामान्य व गरीब रुग्णांचा जीव टांगणीला लागला आला आहे. काही रुग्ण पदरमोड करून खासगी रक्तपेढीतून रक्तघटक विकत घेत आहेत.मेडिकलमध्ये गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. उपचारांदरम्यान आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत असताना रक्त व रक्तघटकाची उपलब्धता महत्त्वाची ठरते. परंतु मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर एफडीएने बोट ठेवत कामकाज बंद ठेवण्याचा आदेश २८ आॅक्टोबर रोजी दिला. त्यानंतर ३० आॅक्टोबर रोजी केवळ ‘होल ब्लड’चा पुरवठा करण्याची परवानगी दिली. मात्र, ‘एलायझा रिडर’मशीनमधील दोष, सेल्स काऊंट मशीन, कोअ‍ॅग्युलो मीटर आणि पी.एच. मीटर मशीन नसल्याच्या त्रुटी काढत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ला परवानगी नाकारली. या मशीन्स उपलब्ध झाल्यावरच परवानगी देणार अशी भूमिका औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी घेतली. यामुळेच मोठा गोंधळ उडाला, असे मेडिकलच्या वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. एफडीएने आणखी १५ दिवसांचा वेळ देत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ला परवानगी दिली असती तर गरीब रुग्णांचे हाल झाले नसते.
मेडिकल प्रशासनाने कधी नव्हे ते चार दिवसांत सुमारे २५ लाखांच्या चार मशीनची तडकाफडकी खरेदी केली. यातील तीन मशीन्स २ नोव्हेंबर रोजी रक्तपेढीत दाखलही झाल्या. परंतु चार दिवसांचा कालावधी होऊनही त्या स्थापनच झाल्या नाहीत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या मशीन्स ‘मिड्री’ या कंपनीच्या आहेत. ही कंपनी गेल्या तीन दिवसांपासून नागपुरातील अभियंत्यांकडून यंत्राची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांना अद्यापही यश आले नाही. आता कंपनी स्वत:चे अभियंता बोलविणार आहे, परंतु यात आणखी एक-दोन दिवस जाणार असल्याने मशीन स्थापन होण्यास उशीर होणार आहे. मात्र, तोपर्यंत गरीब रुग्णांना रक्तघटकांसाठी धावाधाव करावी लागणार आहे.
मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या डेंग्यू, मलेरियाच्या गंभीर रुग्णांसह इतरही रुग्णांना ‘प्लेटलेट’, ‘प्लाझमा’, ‘रेड ब्लड सेल्स’ आणि ‘व्हाईट ब्लड सेल्स’ची गरज पडते. परंतु परवानगीच नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून मेडिकलच्या रक्तपेढीत या घटकांचा ठणठणाट आहे. याचा फायदा घेऊन काही खासगी रक्तपेढीतील एजंट वॉर्डा-वॉर्डात फिरून गरजूंना हेरून दुप्पट भावाने हे रक्तघटक उपलब्ध करून देत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Patients die due to blood components

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.