महागड्या कॅन्सरच्या उपचाराला रुग्णच जबाबदार
By Admin | Updated: July 28, 2015 03:59 IST2015-07-28T03:59:52+5:302015-07-28T03:59:52+5:30
रुग्ण म्हणतात कॅन्सरचा उपचार फार महागडा आहे, हा रोग बरा होणारा नाही. रुग्णाचा मृत्यूच होतो. परंतु

महागड्या कॅन्सरच्या उपचाराला रुग्णच जबाबदार
डॉ. पुरविश पारीख : रुग्णाने सतर्क राहावे, वेळेतच उपचार करावेत
नागपूर : रुग्ण म्हणतात कॅन्सरचा उपचार फार महागडा आहे, हा रोग बरा होणारा नाही. रुग्णाचा मृत्यूच होतो. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. जर वेळेत कॅन्सरचा उपचार केल्यास, स्वस्तात उपचार होतो आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्ण बरा होतो. गरज आहे फक्त या रोगाच्या संदर्भात सतर्कता बाळगण्याची. त्याच्या लक्षणाची माहिती असणे हे म्हणणे आहे मुंबई येथील प्रसिद्ध कॅन्सर रोग विशेषज्ञ आणि आॅन्कोलॉजी अॅण्ड रिसर्चचे संचालक डॉ. पुरविश एम. पारीख यांचे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने जागतिक डोके व मान कर्करोगाच्या दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात ते सहभागी झाले असताना ‘लोकमत’शी बोलत होते. त्यांनी कॅन्सरबाबतच्या अनेक भ्रामक गोष्टींवर प्रकाश टाकला. त्यांनी या रोगाच्या निदानाच्या वेळेला व तत्काळ उपचाराला महत्त्व दिले.
डॉ. पारीख म्हणाले, कॅन्सरवरील उपचार व खर्च वेळेसोबतच वाढत जातो. स्तनाचा कॅन्सर जर आपण घेतला तर ४० वर्षांच्या सर्व महिलांनी महिन्यातून एकदा स्वत:च स्तनाची तपासणी करणे व वर्षातून एकदा मेमोग्राफी करणे आवश्यक आहे. यात जर गाठ आढळली तर सुरुवातीच्या टप्प्यातील उपचाराचा खर्च म्हणजे शस्त्रक्रियेचा खर्च केवळ २५ हजार रुपये पडतो. या टप्प्यात ९७ टक्के रुग्ण पूर्णत: बरा होतो. परंतु असे होत नाही. रुग्ण दुर्लक्ष करतो. सहा महिन्यानंतर २ सेंटीमीटरपर्यंत वाढलेली गाठ हाताला लागते. ही प्रथम स्टेज आहे. याचा खर्चही तेवढाच आहे. रुग्ण बरा होण्याची शक्यता ८७ टक्के असते. परंतु त्यानंतरही रुग्ण विशेष लक्ष देत नाही.रुग्ण दुसऱ्या स्टेजमध्ये येतो. यात उपचार म्हणजे केमोथेरपी देऊन गाठ मोठी केली जाते आणि नंतर शस्त्रक्रिया करून काढली जाते. याचा खर्च ६० हजार रुपयांपर्यंत जातो. रुग्ण बरा होण्याची शक्यता कमी होऊन ७० टक्क्यांवर येते. मात्र रुग्ण दुसऱ्या डॉक्टरांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याच्या मनस्थितीत असल्याने तिसऱ्या स्टेजवर येतो. या स्टेजमध्ये रुग्णावर केमोथेरपी, आॅपरेशन आणि रेडिओथेरपी करावी लागते. याचा खर्च दीड लाख रुपयांपर्यंत जातो आणि वाचण्याची शक्यता ५० टक्के असते. याकडेही अनेक रुग्ण दुर्लक्ष करतात. दुसऱ्या पॅथीमध्ये उपचाराचा शोध घेऊन वेळकाढूपणा करतात. यामुळे कन्सर चौथ्या स्टेजपर्यंत पोहचतो. उपचारांचा खर्च पाच लाखांच्या घरात जातो आणि रुग्ण बरा होण्याची शक्यता फारच कमी होते. याचा परिणाम केवळ रुग्णावरच नाही तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबावरही पडतो. यामुळे प्रत्येकाने कॅन्सरविषयी तसेच त्याच्या लक्षणाविषयीची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.(प्रतिनिधी)
अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध
पूर्वी रेडिएशन देण्यामुळे शरीरातील सामान्य पेशींचे नुकसान व्हायचे. अनेक वेळा कॅन्सरच्या पेशी नष्टही होत नव्हत्या. परंतु आता उपचाराचे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. डॉ. पारीख यांनी सांगितले, ‘टारगेट थेरपी’मुळे एकाच वेळी रुग्णाला २०० पेक्षा अधिक ‘बीम’ दिले जातात. परंतु याचा परिणाम सामान्य पेशींवर न होता थेट कॅन्सर पेशींवर होतो. थ्री डी रेडिओथेरपी, इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिओथेरपी, इमेज गायडेड रेडिओथेरपी हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. लीनियर एक्सीलरेटरच्या सॉफ्टवेअर व हार्डवेअरमध्ये बदल करून उपचाराला आणखी प्रभावी करणेही शक्य झाले आहे.
सरकारकडून भरपूर मदत
अकराव्या पंचवार्षिक योजनेत कॅन्सरसाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु नुकताच केंद्र सरकारने कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी पर्याप्त निधी उपलब्ध करून दिला आहे. डॉ. पारीख म्हणाले, नोएडाच्या झंझर जिल्ह्यात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारने ३२०० कोटी रुपये दिले आहे. जेव्हा की देशातील ३२ प्रादेशिक कॅन्सर सेंटरसाठी ३० कोटी रुपयांपासून १२० कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
कोबाल्ट मशीन नुकसानदायक नाही
कोबाल्ट मशीनला घेऊनही रुग्णांमध्ये अनेक गैरसमज आहेत. यावर डॉ. पारीख म्हणाले, ७० टक्क्यांपर्यंत वाढलेल्या कॅन्सरवर कोबाल्ट मशीनद्वारे उपचार करता येऊ शकतात. यामुळे कुठलेही नुकसान होत नाही. विशेष म्हणजे, कोबाल्ट मशीन कधीच खराब होत नाही. केवळ याचा सोर्स बदलण्याची गरज असते. याला इनव्हर्टरवरही चालविल्या जाऊ शकते. टाटा कॅन्सर रुग्णालयातही कोबाल्ट मशीनचा वापर केला जात आहे. मेडिकल रुग्णालयातीलही कोबाल्ट मशीन चांगल्या स्थितीत आहे. यावर उपचार करण्यास काहीच हरकत नाही.
असा महागडा होत जातो उपचार
४स्तनाचा कॅन्सर पहिल्या स्टेजमध्ये एक सेंटीमीटर गाठ असल्यास शस्त्रक्रियाद्वारे काढता येते. याचा खर्च २५ हजार. ९७ टक्के रुग्ण बरा होण्याची शक्यता असते.
४ सहा महिने ते वर्षभरात याकडे दुर्लक्ष केल्यास गाठ दोन सेंटीमीटरपर्यंत वाढते. ही प्रथमच स्टेज असल्याने उपचार व खर्च तेवढाच होतो. परंतु रुग्ण बरा होण्याची शक्यता कमी होऊन ८० टक्क्यांवर येते.
४त्यानंतर सहा महिन्यानंतर गाठ वाढून चार सेंटीमीटरपर्यंत जाते. ही दुसरी स्टेज आहे. यात किमोथेरेपीचे इंजेक्शन देऊन आॅपरेशन करावे लागते. शस्त्रक्रियेचा खर्च ६० ते ७० हजाराच्या घरात जातो. रुग्ण बरा होण्याची शक्यता ७० टक्के होते.
४आणखी सहा महिने झाल्यानंतर कॅन्सर तिसऱ्या स्टेजमध्ये पोहचतो. येथे रुग्णाला किमोथेरेपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन द्यावे लागते. याचा खर्च दीड लाखांवर जातो. रुग्ण बरा होण्याची शक्यता ५० टक्क्यांवर येते.
४चौथ्या स्टेजमध्ये पोहचलेला कॅन्सर १०० टक्के बरा होत नाही. पाच वर्षांपर्यंत जिवंत राहण्याची शक्यता ३० टक्क्यांपर्यंतच असते. उपचाराचा खर्च पाच लाखांवर जातो.