डायलिसिस केंद्राअभावी रुग्णाचा मृत्यू; अहेरीतील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:01 IST2025-07-09T16:58:30+5:302025-07-09T17:01:20+5:30

आरोग्य व्यवस्थेचा बळी : वेळेवर डायलिसिस न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू

Patient dies due to lack of dialysis center; Question mark on health system in Aheri | डायलिसिस केंद्राअभावी रुग्णाचा मृत्यू; अहेरीतील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Patient dies due to lack of dialysis center; Question mark on health system in Aheri

सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात डायलिसिस केंद्र उपलब्ध नसल्याने एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने डायलिसिस सेंटर सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे.

दि. १ जुलै २०२५ रोजी अहेरी येथील श्री. राजाराम रामा गलबले या रुग्णाचा मृत्यू फक्त वेळेवर डायलिसिस न मिळाल्यामुळे झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अहेरी उपविभागात (सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी) खूप मोठया प्रमाणात रुग्ण असून, या भागात डायलिसिससाठी एकही केंद्र उपलब्ध नाही.

रुग्णांना 200-250 किलोमीटर अंतर पार करून गडचिरोली किंवा चंद्रपूर येथे उपचारासाठी जावे लागते. खराब रस्ते, वाहतुकीचा अभाव आणि आर्थिक अडचणी यामुळे अनेक वेळा रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, परिणामी त्यांचा मृत्यू होतो.

अहेरी येथे डायलिसिस सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित असतानाही अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, ही बाब चिंतेची असून प्रशासनाच्या उदासीनतेचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. सुधीर मुडुमडिगेला, दीपक सुनतकर, शांताराम कुमरे, संतोष आलम, अश्विनी कावरे, रमादेवी पाण्यालावर, कल्याण कोटा, अनिल गलबले, मणिराम पुंगाटी, कल्याणी खोब्रागडे आदींनी मा. जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिरोली यांना निवेदन देऊन अहेरी येथे तात्काळ डायलिसिस सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे.

"रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी ही सुविधा अत्यावश्यक असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून त्वरीत निर्णय घ्यावा," अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे.


"अहेरी उपविभागातील रुग्णांसाठी डायलिसिस सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गंभीर परिणाम होत आहेत. नुकतीच राजाराम रामा गलबले या रुग्णाचा मृत्यू वेळेवर डायलिसिस न मिळाल्यामुळे झाला, ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. अहेरीसारख्या केंद्रस्थानी डायलिसिस सेंटर असणे अत्यावश्यक आहे. आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक यांना याबाबत लेखी निवेदन देऊन तात्काळ डायलिसिस सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा लोकांच्या जीवाशी खेळ होणार."

- डॉ. सुधीर किसन मुडुमडिगेला

"मुख्य निवेदक व सामाजिक कार्यकर्ता प्रतिक्रिया, अहेरी येथील डायलिसिस सेंटर बाबत प्रस्ताव आहे, मात्र डायलिसिस साठी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी लागतो, तेवढे पाणी त्याठिकाणी नसल्यामुळे कामात अडथळे येत होते आता तो प्रश्न सुटला आहे, व लवकरच  सुरु करण्यात येईल."

- डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा शल्यचिकित्सक गडचिरोली

Web Title: Patient dies due to lack of dialysis center; Question mark on health system in Aheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.