व्यावसायिक इमारतींचे पार्किंग कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:37+5:302020-12-30T04:11:37+5:30
आशिष साैदागर लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : व्यावसायिक उद्देशाने बांधण्यात येणाऱ्या इमारतींजवळ नियमानुसार पार्किंगसाठी स्वतंत्र जागा साेडणे आणि त्या ...

व्यावसायिक इमारतींचे पार्किंग कागदावर
आशिष साैदागर
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : व्यावसायिक उद्देशाने बांधण्यात येणाऱ्या इमारतींजवळ नियमानुसार पार्किंगसाठी स्वतंत्र जागा साेडणे आणि त्या जागेचा वापर त्याच कामासाठी करणे आवश्यक आहे. शहरात अनेक व्यावसायिक इमारती उभ्या राहिल्या असून, बहुतांश इमारतींना पार्किंग नाही. संबंधितांनी त्या इमारतीचे पार्किंग कागदाेपत्री दाखविले असून, त्या जागेचा वापर अन्य कामांसाठी केल्याचेही उघड झाले आहे. यात व्यापार संकुल व हाॅस्पिटलचा समावेश आहे.
इमारती बांधकामाला पालिका प्रशासनाची परवानगी घेतेवेळी पार्किंगची स्वतंत्र जागा दाखविणे अनिवार्य असते. ती जागा साेडल्याचे कागदाेपत्री दाखविले जाते. वास्तवात ती जागा पार्किंगसाठी वापरली जात नाही. पार्किंगची साेय नसल्याने वाहनचालक इमारतीसमाेर राेडलगत किंवा मिळेल त्या ठिकाणी वाहने अस्ताव्यस्त उभी करतात. त्यामुळे रहदारीस अडसर निर्माण हाेत असून, वाहतूक काेंडीमुळे अपघात हाेण्याची शक्यता बळावते. या वाहतूक काेंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक हाेते.
वाढत्या नागरीकरणामुळे शहराचा विस्तार हाेत आहे. केवळ पालिका प्रशासनाकडून बांधकाम मंजुरी मिळण्यासाठी पार्किंगची जागा दाखवली जाते. परवानगी मिळताच अतिरिक्त पैसा कमावण्यासाठी त्या जागेचा वापर दुसऱ्या कामासाठी केला जाताे. इमारतींच्या तळमजल्यात पार्किंगची सुविधा करणे शक्य असतानाही त्या जागी दुकानांचे गाळे बांधले जात असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
....
वाहतूक काेंडीची ठिकाणे
कळमेश्वर शहरातील मुख्य बाजारपेठ, कळमेश्वर-काटाेल मार्ग, श्री गजानन महाराज मंदिर राेड, गजानन महाराज चाैक, ब्राह्मणी फाटा या परिसरात याआधीही व्यावसायिक इमारतींचे बांधकाम करण्यात आले असून, नवीन बांधकाम सुरू आहे. ब्राह्मणी फाटा परिसरात माॅल आहे. हा संपूर्ण वर्दळीचा असून, येथील बहुतांश इमारतींना पार्किंग नसल्याने राेडलगत उभी केली जात असलेली वाहने वाहतूक काेंडी व अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
...
बांधकामाला पालिकच्या बांधकाम विभागाकडून परवानगी देताना पार्किंग जागा आहे की नाही, याची खात्री केली जाते. या जागेचा वापर इतर कामांसाठी केला जात असेल तर बांधकाम नकाशांची तपासणी करून चाैकशी केली जाईल. पार्किंग नसेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- स्मृती इखार, नगराध्यक्ष, कळमेश्वर
...
बांधकाम करतेवेळी नियमानुसार पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. ती नसेल व त्यामुळे वाहतूक काेंडी हाेत असेल तर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करीत त्या बाबी निदर्शनास आणून द्याव्या.
- ज्याेत्स्ना मंडपे, न.प. उपाध्यक्ष, कळमेश्वर.
...
पार्किंगच्या जागेचा वापर जर कुणी इतर कामासाठी केला जात असेल तर त्याची चाैकशी करून संबंधितांना नाेटीस बजावल्या जाईल. चाैकशीत सत्यता आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुहे संबंधितांनी पार्किंगची व्यवस्था करावी.
- स्मिता काळे, मुख्याधिकारी, कळमेश्वर.