नागपूर : एका निष्पाप जिवाला वाऱ्यावर सोडून त्याचे जीवनदाते पळून गेले. तो निरागस जोरजोरात रडू लागला. ते एकून खाकी मदतीला धावली. त्याला मायेची उब दिली. आता तो डॉक्टर आणि परिचारिकांच्या देखरेखित दिवस काढत आहे.
जन्मताच नकोसा झालेल्या या सात दिवसांच्या निष्पाप जीवाची माहिती आज रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) जाहिर करण्यात आली. त्यानुसार, सोमवारी रात्री ७ च्या सुमारास सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर आरपीएफचे मुस्ताक शेख आणि योगेश लेकुरवाळे हे दोघे गस्त करीत होते. लिफ्टजवळून त्यांना एका नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बघितले असता बाजुच्या बाकड्याखाली एक नवजात बाळ कपड्यात गुंडाळून असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच आपल्या वरिष्ठांना आणि चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' सुरू झाले. आरपीएफच्या जवानांनी तातडीने धावपळ करीत या चिमुकल्याला जवळ घेतले. बाजुच्या रेल्वे वसाहतीत राहणाऱ्या काही महिलाही पोहचल्या. भूकेने व्याकूळ असलेल्या पाच ते सात दिवसांच्या या चिमुकल्याला मायेची उब मिळताच तो शांत झाला. त्याला नंतर सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याची प्रकृती ठीक असल्याचा निर्वाळा दिला. चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या देखरेखित हा निष्पाप जीव आता पुढचे दिवस काढत आहे.
अनैतिक संबंधातून जन्म ?
या चिमुकल्याचा जन्म अनैतिक संबंधातून झाला असावा. आपले पाप उघड होऊ नये म्हणून त्याला जन्माला घालणारांनी अशा पद्धतीने त्याला दूर करून पळ काढला असावा, असा संशय आहे.
आता 'त्यांची' शोधाशोध
बाळाला तात्काळ मदत देऊन रुग्णालयात पोहचविणाऱ्या आरपीएफने रेल्वे पोलिसांकडे या संबंधाने तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, या निष्पाप जिवाला अशा पद्धतीने वाऱ्यावर सोडणारे 'त्याच जन्मदाते' कोण, त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी रेल्वे स्थानकावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.