३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 05:44 IST2025-05-11T05:40:22+5:302025-05-11T05:44:03+5:30
भारत सरकारच्या अचानक संमतीवर प्रश्न; पाकिस्तानचे कंबरडे मोडले, लढाई सुरूच ठेवली तर पाकिस्तानचा पराभव होता अटळ

३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
रवींद्र भजनी, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भारताने युद्धबंदी मान्य केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा केली. असे का? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी याचे उत्तर दिले. त्यांनी एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तीन डझन देश यासाठी सक्रिय होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच युद्धबंदी शक्य झाली.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख करून डार यांनी सर्वांचे आभार मानले. सुरक्षातज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. भारत चर्चेला तयार नव्हता, मग पाकिस्तानला इतर देशांकडे विनवणी करावी लागली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. तोपर्यंत भारताने यावर सहमती दर्शविली नव्हती. ट्रम्प यांच्या पोस्टमुळेच १७ दिवसांपासून सुरू असलेला तणाव परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या ६० सेकंदांच्या पत्रकार परिषदेने निवळला.
सिंधू पाणी करारासह इतर कठोर निर्णय भारताने घेतल्याने काहीतरी मोठे घडणार असे वाटत होते. ६ मे रोजी रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर केले. पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्यांवर हवाई दलाच्या विमानांनी क्षेपणास्त्र हल्ले केले. देश आणि जगाला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, आम्ही बदला घेतला.
ना पंतप्रधान बोलले ना संरक्षणमंत्री
पाकिस्तानवरील हल्ल्यांनंतर त्याचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना त्यासाठी जबाबदार धरले जात होते. अनेक कमांडरनी एकप्रकारे त्यांच्याविरुद्ध बंड केले होते. तेव्हा बाजू सावरण्यासाठी उपपंतप्रधान आणि अन्य नेते टीव्हीवर समोर आले. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांना पाठवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मीडियासमोर येऊन माहिती दिली नाही.
व्हान्स यांनी मानले आभार
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी या युद्धबंदीबद्दल समाधान व्यक्त करून भारत व पाकिस्तानच्या नेत्यांचे आभार मानले. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या कामी केलेले प्रयत्न फळाला आल्याचे सांगून व्हान्स यांनी रुबियो यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
युद्धबंदीसाठी काय हालचाली ?
ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील तणावावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाल्यावर शनिवारी दिवसभर वेगाने हालचाली सुरू झाल्या. अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी अगोदर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्याशी चर्चा केली. तिकडून सकारात्मक संकेत मिळताच त्यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली.
पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे धाडस अंगलट
भारताविरुद्ध निराधार विधाने करणारे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पडद्यामागे ठेवण्यात आले. पंतप्रधान शहाबाज शरीफ ते इतर नेत्यांनी किमान तीन डझन देशांसमोर विनवणी केली.
भारताचा मास्टर स्ट्रोक
भारताने सर्वप्रथम राजनैतिक आणि इतर संबंध समाप्त केले. त्यानंतर सीमा न ओलांडता क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले.
वेळ दुपारी ३.३५ची, आला फोन अन्
शनिवारी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी भारतीय डीजीएमओंचा फोन खणाणला आणि युद्धावरील तोडग्यासाठी मार्ग निघाला. पाकिस्तानी डीजीएमओंचा हा फोन होता. युद्धबंदीचा प्रस्ताव येताच भारतानेही प्रतिसाद दिला.