जीव भांड्यात; २० तासांचा प्रवास करून विशाखापट्टणमहून नागपुरात पोहोचली ऑक्सिजन एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:55+5:302021-04-24T12:45:33+5:30

नागपूर : नागपूर जिल्ह्याबरोबरच लगतच्या जिल्ह्यांतही कोरोना संक्रमण वेगाने पसरत आहे. रुग्णालये फुल्ल झाली असून, ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना ...

Oxygen Express reaches Nagpur from Visakhapatnam | जीव भांड्यात; २० तासांचा प्रवास करून विशाखापट्टणमहून नागपुरात पोहोचली ऑक्सिजन एक्स्प्रेस

जीव भांड्यात; २० तासांचा प्रवास करून विशाखापट्टणमहून नागपुरात पोहोचली ऑक्सिजन एक्स्प्रेस

Next

नागपूर : नागपूर जिल्ह्याबरोबरच लगतच्या जिल्ह्यांतही कोरोना संक्रमण वेगाने पसरत आहे. रुग्णालये फुल्ल झाली असून, ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना शुक्रवारी सायंकाळी विशाखापट्टणमहून प्राणवायू घेऊन पोहोचलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसने रुग्णांबरोबरच प्रशासनाला दिलासा दिला आहे. ७ टँकर घेऊन आलेल्या या ट्रेनमधून ३ टँकर नागपुरात उतरविण्यात आले. एका टँकरमध्ये १५ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन आहे. या टँकरमध्ये भरलेल्या लिक्विड ऑक्सिजनच्या मदतीने २४ तासांत किमान ४५०० रुग्णांना ऑक्सिजन देणे शक्य असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नेमके हे टँकर शहरातील कुठल्या रुग्णालयांत पाठविण्यात येतील, हे अजून स्पष्ट झाले नाही.

महाराष्ट्रात वेगाने पसरत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता राज्य सरकारच्या विनंतीवर लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू केली आहे. यासाठी रिकाम्या टँकरवाली ऑक्सिजन एक्स्प्रेस १९ एप्रिल रोजी रात्री ८.०५ वाजता मुंबईच्या कळंबोली स्टेशनहून रवाना झाली. बडनेरा, वर्धा, नागपूर, रायपूर मार्गे तब्बल ५० तासांनी विशाखापट्टणमला पोहोचली. यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. येथे ऑक्सिजन भरून निघण्यासाठी सुमारे २५ तास लागले. विशाखापट्टणमच्या स्टील प्लाण्ट यार्डातून ७ टॅँकरमध्ये १०५ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन भरून ही एक्स्प्रेस गुरुवारी रात्री ११.४२ वाजता रवाना झाली. किमान २० तासांचा प्रवास करून शुक्रवारी रात्री ८.१० वाजता नागपूर रेल्वेस्टेशनच्या होमलॅण्ड प्लॅटफॉर्मच्या लूपलाइनवर थांबली. त्यानंतर तीन टँकरवाली वॅगन वेगळी काढण्यात आली. रेल्वे इंजीनच्या मदतीने शटिंग करून होमलॅण्ड प्लॅटफॉर्मच्या रॅम्पवर आणण्यात आले. त्यानंतर टँकरला रस्त्यावर आणण्यात आले. हे टँकर कुठल्या रुग्णालयांत पाठविण्यात येत आहेत, ते स्पष्ट झाले नाही. मनपाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यातील एक टँकर मेयो व मेडिकल रुग्णालयात, एक टँकर अमरावती व एक टँकर सिलिंडर रिफिलिंग कंपनीला देण्यात येईल. परंतु, याबाबत अजूनही अंतिम निर्णय व्हायचा आहे.

- ताशी ६५ किलोमीटर वेगाने धावली एक्स्प्रेस
ऑक्सिजन एक्स्प्रेस लिक्विड ऑक्सिजन टँकरला वॅगनच्या ओव्हर डायनॅमिक चेसीसला बांधण्यात आले होते. किमान ६५ किलोमीटर वेगाने ट्रेन धावत होती. ग्रीन कॉरिडोर लावण्यात आल्याने २० तासांचा वेळ या ट्रेनला नागपुरात पोहोचायला लागला. यापेक्षा अधिक वेगाने चालणाऱ्या ट्रेनलाही एवढाच वेळ लागतो. या ट्रेनमुळे रेल्वेने ५ लाख ४० हजार रुपयांची कमाई केली आहे.

- चार टँकर घेऊन नाशिकला रवाना झाली एक्स्प्रेस
नागपुरात पोहोचलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून ७ पैकी ३ टँकरला स्टेशनवर उतरविल्यानंतर रात्री ८.४५ वाजता उर्वरित ४ टँकर घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशिककडे रवाना झाली.

- या अधिकाऱ्यांची होती उपस्थिती
ऑक्सिजन एक्स्प्रेसचे नागपूर स्टेशनवर आगमन झाल्यानंतर होमलॅण्ड प्लॅटफॉर्मवर मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या मंडळ रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे, अप्पर मंडळ रेल्वे व्यवस्थापक अनुपकुमार सतपथी, वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, आरपीएफ कमांडंट आशुतोष पांडे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Oxygen Express reaches Nagpur from Visakhapatnam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.