एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण २५ हजारांवर तरुण-तरुणी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:06 IST2025-02-21T11:05:55+5:302025-02-21T11:06:44+5:30

Nagpur : या पंचवीस हजार 'गुणवंत' बेरोजगारांनी करायचे काय?

Over 25,000 youth who have passed the MPSC exam are awaiting appointment. | एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण २५ हजारांवर तरुण-तरुणी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

Over 25,000 youth who have passed the MPSC exam are awaiting appointment.

निशांत वानखेडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
बेरोजगारीचा ब्रह्मराक्षस दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रूप धारण करीत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२२ आणि २०२३ मधील राजपत्रित व अराजपत्रित पदांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले राज्यभरातील २५ हजारांवर तरुण-तरुणी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.


पूर्व व मुख्य परीक्षांचा अडथळा दूर करण्यासाठी लाखो बेरोजगारांनी रात्रंदिवस अभ्यास केला. त्यापैकी २५ हजारांवर तरुण-तरुणींनी यश मिळविले. मुलाखतींचा अडथळाही दूर झाला. पेढे वाटून झाले. सत्कारही पार पडले. 


नियुक्त्त्यांना मात्र अद्याप मुहूर्त लागलेला नाही. संबंधित दोन वर्षांमध्ये विविध ३५ संवर्गासाठी राज्यसेवेच्या आणि मेट्रोलॉजी २०२३, अन्न सुरक्षा २०२३, तसेच अराजपत्रितमध्ये पोलिस उपनिरीक्षक आणि लिपिक संवर्गाच्या परीक्षा झाल्या, निकाल लागले; पण उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही. यापैकी अनेकांचे नोकरीचे वय निघून चालले असून, आता ते नैराश्याने ग्रासले आहेत.


निकाल लागले; पण नियुक्त्या रखडल्या...
वर्ष २०२२: राज्यसेवा परीक्षा २०२२ मध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आदी संवर्गातील ६२३ जागांसाठी मुख्य परीक्षा झाली. निकालानंतर ३० नोव्हेंबर २०२३ ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत सात टप्प्यांमध्ये एका पदासाठी तीन उमेदवार या प्रमाणात मुलाखती झाल्या. निवड यादी २७ सप्टेंबर २०२४ ला प्रसिद्ध झाली. अराजपत्रित प्रकारात पोलिस उपनिरीक्षकांच्या ६०३ जागांसाठी २०२२ ला परीक्षा झाली. मुलाखती, वैद्यकीय चाचणी, शारीरिक चाचणी होऊन महिने लोटले. न्यायालयात याचिका दाखल.


वर्ष २०२३ : राज्यसेवा परीक्षा २०२३ मध्ये ३०३ जागांसाठी मुख्य परीक्षा व चार टप्प्यात मुलाखती झाल्या. १३ ऑगस्ट २०२४ ला पहिला तर २४ सप्टेंबर २०२४ ला शेवटचा टप्पा पार पडला. २६ सप्टेंबर २०२४ ला गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र अंतिम यादी व नियुक्त्या अद्याप नाहीत. याच वर्षात अन्न सुरक्षा अधिकारी पदाच्या २०२ जागांसाठी आणि मेट्रोलॉजी विभागाच्या ८३ जागांसाठी परीक्षा झाली. निकाल लागला. मुलाखतीही झाल्या. अराजपत्रित वर्गात लिपिकांच्या ७,५०० जागांसाठी २०२३ ला झालेल्या परीक्षेचा निकाल लागला. एकास तीन याप्रमाणे उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यात आली.


दोन वर्षांपूर्वी तलाठ्यांच्या ४,३०० जागांसाठी परीक्षेस तब्बल ११ लाख तर लिपिकांच्या ७,५०० पदांसाठी ३.५० लाखांवर उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिली. 


"या नियुक्त्त्यांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली नव्हती. आता मुख्यमंत्र्यांनी या भरतीला मंजुरी दिली असून लवकरच नियुक्तिपत्र पाठविण्यात येईल."
- व्ही. राधा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन

Web Title: Over 25,000 youth who have passed the MPSC exam are awaiting appointment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.