युद्धाचा भडका; पेट्रोल-डिझेल १० रुपयांनी वाढण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 21:20 IST2022-02-24T21:19:33+5:302022-02-24T21:20:59+5:30
Nagpur News युद्धाचा भडका आणि उत्तर प्रदेशात सातव्या टप्प्यातील मतदान ७ मार्चला होताच त्याच रात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे भाव १० रुपयांनी वाढण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.

युद्धाचा भडका; पेट्रोल-डिझेल १० रुपयांनी वाढण्याचे संकेत
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर केंद्र सरकारचे नियंत्रण नसल्याचे सांगण्यात येते, पण पाच राज्यात निवडणुका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन्ही इंधनाचे दर ४ नोव्हेंबरपासून वाढविले नाहीत. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर १०३ डॉलर प्रति बॅरलवर गेले आहे. त्यानंतरही सरकारने दरवाढ केली नाही, पण युद्धाचा भडका आणि उत्तर प्रदेशात सातव्या टप्प्यातील मतदान ७ मार्चला होताच त्याच रात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे भाव १० रुपयांनी वाढण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.
दोन्ही इंधनाचे दर १० रुपयांनी वाढल्यास सर्व करांसह नागपुरात जवळपास १३ रुपयांनी दरवाढ होणार आहे. त्यानंतर दररोज ३० ते ८० पैसे वा एक रुपयाने दरवाढीची शक्यता आहे. मार्चच्या अखेरपर्यंत १२५ रुपये लिटरपर्यंत भाव जाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार झाल्यास त्यानुसार पेट्रोल व डिझेलच्या किमती बदलतात, असे सरकारकडून सांगण्यात येते. खासगी व सरकारी कंपन्यांमार्फत देशभरात पेट्रोल व डिझेलची विक्री होते. ४ नोव्हेंबरला पेट्रोल १०९.६८ रुपये आणि डिझेल ९२.५१ रुपये लिटर होते तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ६४ डॉलर बॅरल होते. गुरुवारी हेच दर १०३ डॉलर बॅरलवर गेले आहेत. त्यामुळे पुढे दरवाढ अटळ आहे. पण ती पाच राज्यातील निवडणुकीमुळे थांबली आहे. पण ७ मार्चनंतर दरवाढ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.