"आपला समाज इतिहास विसरतो, त्यामुळेच.. " अनसूयाबाई काळे स्मृती सदनाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन
By आनंद डेकाटे | Updated: November 15, 2025 17:04 IST2025-11-15T17:03:05+5:302025-11-15T17:04:15+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : अनसूयाबाई काळे स्मृती सदनाचे उद्घाटन

"Our society forgets history, that's why..." Chief Minister appealed at the inauguration of Anasuyabai Kale Memorial House
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपला समाज इतिहास विसरतो, त्यामुळेच कधी काळी आपल्याला गुलामगिरीत जावे लागले होते. त्यामुळे परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उत्तर अंबाझरी मार्गावरील अनसूयाबाई काळे स्मृती सदन आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वर्किंग वूमन अँड गर्ल्स होस्टेलच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अतिथी म्हणून अँम्परसँड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुस्तम केरावाला उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जातीयतेविरोधातील लढ्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या अनसूयाबाई यांनी महिलांच्या उत्थानासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी केलेले परिश्रम प्रेरणादायी आहे. देशाच्या पहिल्या संसदेत त्यांनी नागपूरचे प्रतिनिधित्व केले होते. महिलांच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यातील हक्काचा आवाज म्हणजे अनसूयाबाई होत्या. त्यांचे विचार, लेखन पुरोगामी होते. त्यात सुधारणवादाचा विचार होता. आयुष्यात अनेकांच्या प्रेरणा ठरलेल्या अनसूयाबाई या आपल्या समाजाच्या आदर्श आहेत. नागपूर शहराने जी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे पाहिली, त्यापैकी अनसूयाबाई एक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी काळे फाऊंडेशन ट्रस्टचे विश्वस्त विलास काळे यांनी प्रास्ताविकात अनसूया बाईंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. व्यासपीठावर एआयडब्ल्यूसीच्या माजी अध्यक्ष शीला काकडे, पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या अध्यक्ष नीलिमा शुक्ला, सचिव नीला कर्णिक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन सरिता कौशिक यांनी केले. आभार अनसूया काळे - छाबरानी यांनी मानले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नाटकाच्या प्रॅक्टिसची आठवण
आपण लहानापासून ही इमारत पाहतो आहे. वेगवेगळ्या कारणाने अनेकदा इथे आलो. अलीकडे इमारतीची अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे या इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव येताच त्याला मंजुरी देण्यात आली. कधी काळी नाटकाच्या प्रॅक्टिससाठी मी या इमारतीत यायचो, अशी आठवणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितली.