सदस्यता मोहिमेनंतर भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुका
By योगेश पांडे | Updated: February 13, 2025 22:31 IST2025-02-13T22:30:50+5:302025-02-13T22:31:32+5:30
ही मोहीम संपल्यावर पक्षात संघटनात्मक निवडणुका घेण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

सदस्यता मोहिमेनंतर भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुका
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज्यपातळीवर दीड कोटी नवीन सदस्यांच्या नोंदणीवर भाजपकडून भर देण्यात येत आहे. ही मोहीम संपल्यावर पक्षात संघटनात्मक निवडणुका घेण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
गुरुवारी बावनकुळे यांनी नागपुरात पक्ष सदस्यता नोंदणीचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील उपस्थित होते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच संघटनात्मक निवडणुका सुरू करण्याची परवानगी दिली होती. कार्यकर्त्यांच्या मदतीने १ कोटी ५१ लाख नवीन सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ४० दिवसांत एक कोटी दहा लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. १८ मार्चपर्यंत ४० लाखांहून अधिक सदस्य जोडले जातील. त्यानंतर संघटनात्मक निवडणुका होतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याला ५० ते १०० नवीन सदस्य बनवण्याचे लक्ष्य देण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंचायतीतून संसदेपर्यंत जाण्याचे लक्ष्य लक्षात घेऊन नवीन सदस्य बनवण्यात यावे, असे आवाहन केले. जगनाडे चौकातील एका हॉटेलमध्ये ही बैठक झाली. यात प्रामुख्याने पूर्व विदर्भातील पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रत्येक बूथवर किमान २०० सदस्य आणि प्रत्येक कार्यकर्त्यामागे ५० ते १०० सदस्य करणे आवश्यक आहे. बूथ कार्यकर्त्यापासून ५० सदस्य बनवणारा कार्यकर्ताच राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी होऊ शकतो, असे सांगण्यात आले. बावनकुळे आणि कार्याध्यक्ष चव्हाण यांनी पूर्व विदर्भातील सदस्यत्वाचे लक्ष्य गाठणाऱ्या १० विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सरचिटणीस विक्रांत पाटील, राजेश पांडे यांनी सदस्यत्व आणि सक्रिय सदस्यत्व मोहिमेवर प्रकाश टाकला. व्यासपीठावर आमदार, माजी आमदार आणि राज्याचे अधिकारी उपस्थित होते. प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी संचालन केले, तर विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी आभार मानले.