संत्रा, मोसंबी उत्पादकांची दरवर्षी २२५ कोटी रुपयांनी लूट
By सुनील चरपे | Updated: July 28, 2025 15:09 IST2025-07-28T15:08:08+5:302025-07-28T15:09:01+5:30
१० टक्के काट व ७ टक्के कमिशन : नागपूरच्या कळमना बाजार समितीतील प्रकार

Orange and grapefruit producers are robbed of Rs 225 crore every year
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना (नागपूर) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये संत्रा व मोसंबीच्या खरेदीवर व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रतिटन एक क्विंटल म्हणजेच १० टक्के काट आणि सात टक्के कमिशन घेतात. हा प्रकार मागील २५ वर्षापासून सुरू आहे. या बाजार समितीत व्यापारी दरवर्षी सरासरी ३ लाख ५० हजार टन संत्रा व २ लाख ७५ हजार टन मोसंबी शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. १० टक्के काट विचारात घेता शेतकऱ्यांची १५० कोटी रुपये व सात टक्के कमिशनपोटी १०५ कोटी रुपयांची लूट सुरू आहे.
व्यापारी कळमना मार्केटमधील शेतकऱ्यांकडून ११ क्विंटल संत्रा व मोसंबी खरेदी करतात आणि १० क्विंटल (एक टन) चे पैसे देतात. सोबतच एकूण रकमेवर सात ते आठ टक्के कमिशन घेतात. हा प्रकार मागील २५ वर्षापासून सुरू आहे. पूर्वी पाच टक्के म्हणजे १० क्विंटलवर ५० किलो काट घेतला जायचा. सोबतच कमिशनदेखील कमी होते. सन २०१५ पासून एक क्विंटल काट व सात ते आठ टक्के कमिशन घेणे सुरू झाले. जेव्हापासून वजनाने संत्रा, मोसंबी खरेदी करणे सुरू झाले, तेव्हापासून हा प्रकार सुरू झाला, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. या संपूर्ण व्यवहाराची एसआयटीमार्फत स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे.
पणन संचालकांकडे तक्रार
काट व कमिशनबाबत डिसेंबर २०२४ मध्ये कळमना बाजार समितीच्या सभागृहात पणन संचालक रसाळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात संत्रा व मोसंबी उत्पादकांच्या १०० प्रतिनिधींनी आ. डॉ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत रसाळ यांच्याकडे तक्रार करत हा प्रकार बंद करून कारवाईची मागणी केली. मात्र, काहीच कारवाई करण्यात आली नाही.
लुटीचा हिशेब
- संत्रा व मोसंबीचे सरासरी दर २५ हजार रुपये प्रतिटन आणि १० टक्के काट म्हणजेच प्रत्येकी ३० हजार टन संत्रा व मोसंबी विचारात घेतल्यास ही रक्कम प्रत्येकी ७५ कोटी रुपयांप्रमाणे १५० कोटी रुपये होतात.
- संत्रा व मोसंबीच्या एकूण रकमेवरील सात ते आठ टक्के कमिशन विचारात घेतले तर ही रक्कम १०५ कोटी रुपयांवर जाते. दोन्ही मिळून ही लूट २२५ कोटी रुपयांवर पोहोचते. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही.
शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावी
शेतकरी एकमुस्त संत्रा, मोसंबी विकायला आणतात. त्यात लहान, मध्यम व मोठ्या आकाराची फळे असतात. व्यापारी लहान व मध्यम आकाराच्या फळांवर लक्ष केंद्रित करून दर ठरवतात व नुकसान टाळण्यासाठी काट घेतात. शेतकऱ्यांनी स्वतःच बागेची विरळणी करून मोठ्या आकाराची फळे बाजारात विकावी. झाडांवरील छोटी व मध्यम फळे मोठी झाल्यानंतर ती बाजारात आणावी.
संत्र्याची खरेदी
सन २०२३-२४ ३,४५,२६० टन
सन २०२४-२५ ३,६७,२५२ टन
मोसंबीची खरेदी
सन २०२३-२४ ३,०१,२९४ टन
सन २०२४-२५ १,९६,६९४ टन