विदर्भात ऑरेंज अलर्ट; थंडी वाढणार, दोन दिवस पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 20:39 IST2021-12-27T20:39:09+5:302021-12-27T20:39:36+5:30
Nagpur News नागपूरसह विदर्भात येत्या दिवसात पुन्हा थंडी वाढणार आहे. हवामान विभागाने संपूर्ण विदर्भात २८ व २९ तारखेला पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट दिला आहे.

विदर्भात ऑरेंज अलर्ट; थंडी वाढणार, दोन दिवस पावसाचा इशारा
नागपूर : नागपूरसह विदर्भात येत्या दिवसात पुन्हा थंडी वाढणार आहे. हवामान विभागाने संपूर्ण विदर्भात २८ व २९ तारखेला पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट दिला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, २८ आणि २९ डिसेंबरला काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस व तुरळक मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली असून ३० डिसेंबरला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून थंडीमध्ये वाढ झाली असतानाच सोमवारी सायंकाळनंतर अचानकपणे वातावरण अधिकच थंडावले आहे. पाऊस आल्यास विदर्भात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता अधिक आहे.
मागील २४ तासांत नागपुरात कमाल तापमानाची नोंद १४.४ अंश सेल्सिअस करण्यात आली आहे. गोंदियात सर्वात कमी १२.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर यवतमाळचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. नागपुरात दिवसभराच्या तुलनेत सायंकाळनंतर तापमानात बरीच घट झाली. यामुळे सायंकाळनंतर रस्त्यावरील वर्दळही बरीच कमी झालेली पाहण्यात आली.
शेतकऱ्यांना खबरदारीचे आवाहन
जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. शेळ्या व मेंढ्यांना मोकळ्या जागेत चरावयास टाळावे. परिपक्व अवस्थेतील पिकांची काढणी केली असल्यास पीक सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ताडपत्रीने झाकून ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
...