लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नगरसेवकांनी प्रभागात किती विकास कामे केली, हे त्या प्रभागातील नामफलकावरून निदर्शनास येते. गेल्या वर्षभरात अनेक नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारची विकास कामे केलेली नाही. मात्र जुन्या विकास कामांच्या ठिकाणी माजी नगरसेवकांच्या नावांचे फलक लागलेले आहे. यामुळे प्रभागात आपली प्रतिमा मलीन होत आहे असे काही विद्यमान नगरसेवकांना वाटते. प्रतिमा उजाळण्यासाठी प्रभागातील फलकावरील माजी नगरसेवकांची नावे पुसून आपल्या नावाच्या पाट्या लावण्याचा खटाटोप सुरू केला आहे. अपयश लपविण्यासाठी हा उपद्व्याप सुरू असल्याने यातून प्रभागातील शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.महापालिकेच्या प्रभाग ६ व ३ मध्ये हा खटाटोप सुरू आहे. ६ मधील विद्यमान नगरसेवक मोहम्मद इब्राहिम यांनी प्रभागातील फलकावरील माजी नगरसेवकांचे नाव पुसून आपले नाव लिहिण्यासाठी आसीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्याकडून ४० हजारांच्या फाईलला मंजुरी घेतली आहे. या प्रभागात असलम खान १० वर्षे नगरसेवक होते. मात्र गेल्या निवडणुकीत बसपाचे इब्राहिम यांनी त्यांचा काठावर पराभव केला. नगरसेवक होऊ न वषं झाले, पण प्रभागात विकास कामे करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचे फलक नाही. त्यामुळे त्यांनी असलम खान यांच्या नावाचे फलक मिटवून आपल्या नावाचे फलक लावण्यासाठी झोन कार्यालयाकडे फाईल सादर केली. सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्याकडे ही फाईल प्रलंबित होती. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कारखाना विभागात पाठविण्यात आले. गणेश राठोड यांच्याकडे सहायक आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी या फाईलला मंजुरी दिली. मात्र झोनमधील अधिकाºयांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. यासंदर्भात इब्राहिम अहमद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.माजी नगरसेवकांचे नाव पुसून नवीन नाव लिहिण्याला प्रभागातील नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रभागातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे. असाच खटाटोप प्रभाग ३ मधील एका नगरसेवकाकडून सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. झोनकडे पाठविल्याची माहिती आहे.आकस्मिक निधीतून तरतूदतातडीच्या कामासाठी झोन स्तरावरून निधी उपलब्ध करता यावा. यासाठी आकस्मिक निधी ठेवला जातो. या निधीतून माजी नगरसेवकांची फलकावरील नावे पुसण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.अशा कामासाठी यातून निधी उपलब्ध करणे संयुक्तिक नाही. असे असूनही निधी उपलब्ध केला आहे. यावर माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नागपुरात माजी नगरसेवकांची नावे पुसण्याचा खटाटोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:40 IST
प्रतिमा उजाळण्यासाठी प्रभागातील फलकावरील माजी नगरसेवकांची नावे पुसून आपल्या नावाच्या पाट्या लावण्याचा खटाटोप सुरू केला आहे. अपयश लपविण्यासाठी हा उपद्व्याप सुरू असल्याने यातून प्रभागातील शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नागपुरात माजी नगरसेवकांची नावे पुसण्याचा खटाटोप
ठळक मुद्देविकासाचा विसर : प्रभाग ६ व ३ मध्ये फलकावरून राजकारण