"कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची माती" निषेध व्यक्त करत विरोधकांचे आंदोलन
By मंगेश व्यवहारे | Updated: December 18, 2024 11:26 IST2024-12-18T11:22:35+5:302024-12-18T11:26:00+5:30
Nagpur : ‘शेतकऱ्याला लुटणाऱ्या सरकारचार धिक्कार असो’, घोषणा देत विरोधकांचे विधानभवन परिसरातील पायऱ्यांवर आंदोलन

Opposition protesting "cotton wicks, soybean soil"
मंगेश व्यवहारे
नागपूर : ‘कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची माती’, ‘शेतकऱ्याला लुटणाऱ्या सरकारचार धिक्कार असो’, अशा घोषणा देत आणि गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून विरोधकांनी बुधवारी विधानभवन परिसरातील पायऱ्यांवर आंदोलन केले.
कापूस, सोयाबीनला भाव देण्यात यावा तसेच धानाला बोनस मिळावा या मुद्द्याकडे लक्ष वेधत विरोधकांनी सत्तापक्षावर हल्ला चढविला. ‘महागाई गगनाला, शेतकरी भुईला’, ‘कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरी, सत्ताधारी आमदारांची मंत्रिपदासाठी मारामारी’, ‘शिंदे फडणवीस पवारांना खुर्चीची धाव... कापूस सोयाबीन तुरीला नाही भाव’ असे फलक घेऊन विरोधी पक्षातील आमदारांनी शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा मुद्दा मांडला. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक दिसून आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याबाबत अधिक सांगताना म्हणाले,‘राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शेतकरी आत्महत्या करतोय. सोयाबीन, कापसाला योग्य भाव नाही. धानाला बोनस नाही, अशी स्थिती आहे. सरकारने शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.’ आमदार सतेज पाटील म्हणाले,‘महागाई वाढली असून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे हवालदिल झाला आहे.’ यावेळी आंदोलनात नाना पटोले, सुनील प्रभू, भाई जगपात, अमित देशमुख, संदीप क्षीरसागर, सुनील शिंदे, संजय मेश्राम, नितीन राऊत, विकास ठाकरे, प्रज्ञा सातव आदी आमदारांचा सहभाग होता.