कोट्यवधीचा भूखंड कवडीमोलात दिल्याचा ठपका; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2022 12:01 IST2022-12-21T11:10:51+5:302022-12-21T12:01:31+5:30
खोके घेऊन भूखंड ओके करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, विरोधकांच्या घोषणांनी परिसर दणाणला

कोट्यवधीचा भूखंड कवडीमोलात दिल्याचा ठपका; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. एनआयटी भूखंड घोटाळा आज विधानभवनात गाजला. खोके घेऊन भूखंड ओके करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, राजीनामा द्या, राजीनामा द्या.. मुख्यमंत्री राजीनामा द्या अशा घोषणांनी तिसऱ्या दिवशी विधान भवन परिसर दणाणून सोडला.
भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, भ्रष्ट सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय अशा घोषणा देत विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नाना पटोले, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, रविंद्र वायकर, रोहित पवार, अशोक चव्हाण, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील शशिकांत शिंदे, सुनील राऊत, सुनील प्रभू, यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्वच आमदार सहभागी झाले होते.
एनआयटीचा ८३ कोटींचा भूखंड २ कोटीत देऊन घोटाळा केल्याचा ठपका मुख्यमंत्री व सरकारवर ठेवण्यात आला असून या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे, असे आमदारांनी सांगितले.