विरोधकांत सरकारला घेरण्याची हिम्मत नाही - चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 12:24 IST2023-02-28T12:22:23+5:302023-02-28T12:24:35+5:30
मंत्रिमंडळ विस्तार आवश्यक

विरोधकांत सरकारला घेरण्याची हिम्मत नाही - चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर :महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्याची पिछेहाट झाली. आता त्यांच्याकडे बोलण्यासाठी ठोस मुद्देच नसल्याने ते वाटेल ते आरोप करत आहेत. विरोधक विद्यमान राज्य शासनाला घेरूच शकत नाहीत, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विधिमंडळातील व्हीपवरदेखील त्यांनी यावेळी भाष्य केले. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. त्यांच्या बी फाॅर्मवरसुद्धा शिवसेना आहे. त्यामुळे यांनी दिलेला व्हीप दुसऱ्या गटाला मानावाच लागेल. जर असे झाले नाही तर नियमाप्रमाणे कारवाई होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची आवश्यकता आहे. याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री योग्य निर्णय लवकरच घेतील, असे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावावरून घाणेरडे राजकारण केले जात आहे. राजकारणासाठी लोकांचा स्तर एवढा खाली गेला आहे की, लोक सावरकरांच्या भूमिकेवर तथ्यहीन वक्तव्य करायला लागले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.