‘माओवादी’ प्राध्यापक जेरबंद गडचिरोली पोलिसांची दिल्लीत कारवाई

By Admin | Updated: May 10, 2014 02:34 IST2014-05-10T00:38:55+5:302014-05-10T02:34:33+5:30

जहाल नक्षलवाद्यांच्या देशभरातील कामात सक्रिय असलेला आंतरराष्ट्रीय विभागाचा अध्यक्ष तसेच देशपातळीवर नक्षल चळवळीसाठी समन्वयक म्हणून काम .....

Operation of Maoist Professor Zeraband Gadchiroli Police in Delhi | ‘माओवादी’ प्राध्यापक जेरबंद गडचिरोली पोलिसांची दिल्लीत कारवाई

‘माओवादी’ प्राध्यापक जेरबंद गडचिरोली पोलिसांची दिल्लीत कारवाई

नक्षलवाद्यांच्या आंतरराष्टÑीय विभागाचा अध्यक्ष

अभिनय खोपडे - गडचिरोली

जहाल नक्षलवाद्यांच्या देशभरातील कामात सक्रिय असलेला आंतरराष्ट्रीय विभागाचा अध्यक्ष तसेच देशपातळीवर नक्षल चळवळीसाठी समन्वयक म्हणून काम करणारा दिल्ली विद्यापीठाचा प्रा. जी. एल. साईबाबा याला शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी दिल्लीत अटक केली. त्याच्यावर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असून शनिवारी (दि. १०) अहेरी न्यायालयात त्याला हजर केले जाणार आहे. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या हेम मिश्रा या विद्यार्थ्याला नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी जात असताना बल्लारपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातून उत्तराखंडच्या प्रशांत सांगलीकर ऊर्फ राही या नक्षलवाद्याला अटक केली होती. या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आॅक्टोबर महिन्यात दिल्लीत साईबाबाच्या घराची झडती घेण्यात आली होती. चौकशीत साईबाबा नक्षल चळवळीत सक्रिय असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. साईबाबा नक्षलवाद्यांच्या आंतरराष्टÑीय विभागाचा अध्यक्ष म्हणून काम बघत होता. त्यासाठी त्याने अनेकदा परदेशवार्‍याही केल्या होत्या. इंग्रजीचा प्राध्यापक असल्याने नक्षल चळवळीमध्ये देशभर समन्वय ठेवण्याचे काम तो करीत होता. देशात सक्रिय असलेल्या बुद्धिवंतांचा पाठिंबा या चळवळीला मिळवून देण्याचेही काम तो करीत असल्याचे जप्त केलेल्या कागदपत्रावरून स्पष्ट झाले आहे. या आधारे अहेरी पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. या तिघांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करण्यास राज्याच्या गृहमंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर लगेच शुक्रवारी पोलिसांनी ही कारवाई दिल्लीत जाऊन केली. ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना व तपास अधिकारी सुहास बावचे यांच्या पथकाने दिल्लीत केली. त्यानंतर साईबाबाला अटक करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Operation of Maoist Professor Zeraband Gadchiroli Police in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.