राज्यात स्पेशालिस्ट डॉक्टरांची अवघी ६९० पदे; त्यातही ५०८ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 11:39 IST2021-02-17T11:38:47+5:302021-02-17T11:39:15+5:30
Nagpur News आरोग्य विभागाकडे स्पेशालिस्ट डॉक्टरांची अवघी ६९० पदे मंजूर आहेत. यातही १७२ पदे भरली असून तब्बल ५०८ पदे रिक्त आहेत.

राज्यात स्पेशालिस्ट डॉक्टरांची अवघी ६९० पदे; त्यातही ५०८ पदे रिक्त
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला आहे. साध्या आजारावरील उपचारासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाण्याचा कल वाढला आहे. असे असताना, आरोग्य विभागाकडे स्पेशालिस्ट डॉक्टरांची अवघी ६९० पदे मंजूर आहेत. यातही १७२ पदे भरली असून तब्बल ५०८ पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा लंगडी होत चालल्याचे धक्कादायक चित्र आहे.
राज्यात आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यासारखी शासकीय रुग्णालये जवळपास कंत्राटी कर्मचाºयांच्या जीवावर चालले आहे. अत्यल्प वेतनावर या विभागात डॉक्टरांपासून ते परिचारिका व कर्मचारी काम करत आहेत. बहुतेक ठिकाणी ‘एमबीबीएस’ डॉक्टरांची शेकडो पदे रिक्त आहे. विशेषज्ञ डॉक्टरांची पदे केवळ नावालाच आहेत. परिणामी, आरोग्य विभागाचे बहुतेक उपक्रम हे ताकदीनीशी राबविणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात रिक्त असलेल्या स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या रिक्त पदांची विषयावर माहिती उपलब्ध झाली नाही. परंतु या क्षेत्रातील तज्ज्ञानुसार, जनरल सर्जन, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, इएनटी तज्ज्ञ, पॅथोलॉजी तज्ज्ञ,रेडिओलॉजी तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञाच्या मंजुर पदापैकी जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. फिजीशियन, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञाची सुमारे ४० टक्केही पदे भरलेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
-पूर्व विदर्भात ग्रामीण रुग्णालयांची स्थिती बिकट
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील रुग्णालयात विविध विषयातील विशेज्ञाची पदे रिक्त असल्याने बिकट स्थिती निर्माण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, फिजीशियनची २८ पैकी सुमारे ११ पदे, बालरोग तज्ज्ञाची १०५ पैकी ४० पदे, जनरल सर्जनची २७ पैकी ६ पदे, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञाची १०९ पैकी ५० पदे, बधिरीकरण तज्ज्ञाची १०७ पैकी ५६ पदे, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञाची २२ पैकी ४ पदे, नेत्ररोग तज्ज्ञाची २० पैकी ४ पदे, त्वचारोग तज्ज्ञाची दोन्ही पदे, ईएनटी तज्ज्ञाची सहाही पदे, पॅथोलॉजी तज्ज्ञाची सातही पदे, रेडिओलॉजी तज्ज्ञाची आठ पैकी २ पदे, मानसोपचार तज्ज्ञाची पाचही पदे, रक्तसंक्रमण अधिकारीची (बीटीओ) ६ पैकी पाच पदे तर तर पीएसम तज्ज्ञाची १७ पैकी ७ पदे अशी एकूण सुमारे २२२ पदे रिक्त आहेत.
-विशेषज्ञ डॉक्टरांची ५० टक्के पदे भरली जाणार
राज्यात विशेषज्ञ डॉक्टरांची मोठ्या संख्येत पदे रिक्त आहेत. यातील ५० टक्के पदे भरण्याला मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही पदे भरली जाणार आहे.
-डॉ. साधना तायडे
संचालक, आरोग्य विभाग