सिलिंडर्सची ऑर्डर देऊन एजन्सीच्या कर्मचाऱ्याला ऑनलाईन गंडा
By योगेश पांडे | Updated: April 24, 2023 18:07 IST2023-04-24T18:07:13+5:302023-04-24T18:07:27+5:30
सिलिंडर्सची ऑर्डर देऊन एजन्सीच्या कर्मचाऱ्याला ऑनलाईन गंडा घालण्यात आला.

सिलिंडर्सची ऑर्डर देऊन एजन्सीच्या कर्मचाऱ्याला ऑनलाईन गंडा
नागपूर: नागपूर विमानतळावर कार्यक्रमासाठी कमर्शिअल सिलिंडर्सची आवश्यकता असल्याची बतावणी करत एका व्यक्तीने गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याला ऑनलाईन गंडा घातला. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. राहुल गायधने (कुंभारटोली) असे संबंधित कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो हजारीपहाड येथील एचपी गॅसच्या एजन्सीत काम करतो.
फेब्रुवारी महिन्यात त्याला महादेव सिंह नावाच्या व्यक्तीचा फोन आला व त्याने तो विमानतळावरून बोलत असल्याचे सांगितले. विमानतळावर कार्यक्रमासाठी १० कमर्शिअल सिलिंडर्सची आवश्यकता असल्याचे त्याने राहुलला सांगितले. राहुलने त्याला सिक्युरिटी चार्ज भरावा लागेल असे स्पष्ट केले. यावर आरोपीने रोख रक्कम देण्याची तयारी दाखविली व सिलिंडर्सची डिलिव्हरी करण्यास सांगितली. डिलिव्हरी बॉय विमानतळावर गेला असता तेथे महादेव सिंह नव्हता. त्याने ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगितले व राहुलला क्यू आर कोड पाठविला. राहुलने तो कोड स्कॅन केला असता त्याच्या खात्यातून तीन वेळा एकूण ९० हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात वळती झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राहुलने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली . पोलिसांनी आरोपीविरोधात आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.