ऑनलाईन कुलर विक्रीची मोठ्या व्यापाऱ्यांना सूट, छोट्यांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 23:14 IST2020-04-21T23:12:09+5:302020-04-21T23:14:18+5:30
शहरामध्ये केवळ मोठ्या व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विक्रीची सूट देण्यात आली आहे. लहान व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विकण्यास मनाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेचा हा निर्णय भेदभावपूर्ण आहे, असा आरोप महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी केला आहे.

ऑनलाईन कुलर विक्रीची मोठ्या व्यापाऱ्यांना सूट, छोट्यांना बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरामध्ये केवळ मोठ्या व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विक्रीची सूट देण्यात आली आहे. लहान व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विकण्यास मनाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेचा हा निर्णय भेदभावपूर्ण आहे, असा आरोप महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी केला आहे.
महात्मा फुले मार्केट व्यापारी संघानुसार, ऑनलाईन कुलर विक्रीला परवानगी मिळत असल्याची माहिती १५ एप्रिल रोजी मिळाल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अशी परवानगी मिळण्यासाठी निवेदन सादर केले. त्या व्यापाऱ्यांना १७ एप्रिल रोजी बोलावण्यात आले व एक पत्र देऊन मनपा आयुक्तांची परवानगी घेण्यासाठी पाठविण्यात आले. मनपा आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्यानंतर अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन यांच्या पीएने त्यांना २० एप्रिल रोजी बोलावले. परंतु, २० एप्रिल रोजी त्यांना मनपा आयुक्तांना भेटू देण्यात आले नाही. तसेच, त्यांना ऑनलाईन कुलर विकण्याची परवानगी दिली जाणार नाही असे सांगण्यात आले.
महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, मनपा आयुक्त ज्या प्रमाणे मोठ्या व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विकण्याची परवानगी देऊ शकतात, त्या प्रमाणे छोट्या व्यापाऱ्यांना परवानगी का दिली जात नाही. ज्या प्रमाणे मोठे व्यापारी नियमांचे पालन करून कुलर विकत आहेत, त्याप्रमाणे महात्मा फुले मार्केटमधील व्यापारीही नियमांचे पालन करून ऑनलाईन कुलर विकतील. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांनाही ऑनलाईन कुलर विक्रीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ऑनलाईन कुलर विकण्याची परवानगी द्यावी
महात्मा फुले मार्केट येथे विदर्भातील सर्वात मोठे कुलर मार्केट आहे. लॉकडाऊनमुळे हे मार्केट महिनाभरापासून बंद आहे. सध्या कुलर विक्रीचा हंगाम असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच, तापमान सतत वाढत असल्यामुळे नागरिकांनाही कुलरची गरज आहे. या परिस्थितीत महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विकण्याची त्वरित परवानगी दिली गेली पाहिजे.
दीपक शर्मा, सहसचिव, महात्मा फुले मार्केट व्यापारी संघ.