उपराजधानीत परत एकदा ‘कोरोना’चा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 13:18 IST2021-03-04T13:18:35+5:302021-03-04T13:18:54+5:30
Nagpur News उपराजधानीत परत एकदा ‘कोरोना’चा धोका वाढला असून आकडा अकराशेच्या पार गेला आहे.

उपराजधानीत परत एकदा ‘कोरोना’चा धोका वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत परत एकदा ‘कोरोना’चा धोका वाढला असून आकडा अकराशेच्या पार गेला आहे. ‘कोरोना’च्या लसीकरणाला सुरुवात झाली असताना वाढलेले आकडे चिंता वाढविणारे आहे. बुधवारी जिल्ह्यात १ हजार १५२ नवीन रुग्णांची भर पडली तर ६ जणांचा मृत्यू झाला. जर चाचण्यांच्या तुलनेत टक्केवारी काढली तर ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचे प्रमाण ९.८० टक्के इतके आहे.
बुधवारी जिल्ह्यामध्ये एकूण ११ हजार ७५० चाचण्या झाल्या. यातील १ हजार १५२ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आले. ८९७ रुग्ण हे शहरातील असून, ग्रामीणचा आकडा २५२ इतका आहे. शहरातील दोन तर ग्रामीणमधील एका ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू झाला. तीन मृत्यू हे जिल्हाबाहेरील रुग्णांचे होते.
सव्वानऊ हजार ‘अॅक्टिव्ह’ रुग्ण
बुधवारी जिल्ह्यामध्ये एकूण ९ हजार २९५ ‘अॅक्टिव्ह’ रुग्ण होते. त्यात शहरातील ७ हजार ६३१ तर, ग्रामीणमधील १ हजार ६६४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या १ लाख ५२ हजार ८१२ वर पोहोचली असून, ४ हजार ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण २ हजार २३० रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत.