बापरे ! दुर्लक्षित असलेल्या 'एनटीडी' आजारामुळे दरवर्षी एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:47 IST2025-01-31T16:46:24+5:302025-01-31T16:47:41+5:30
डॉ. चंद्रशेखर मेश्राम : जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन

Oh my! Neglected NTDs affect over a billion people every year
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उष्णकटिबंधीय रोग (एनटीडी) म्हणजे, न्यूरोसिस्टीरकोसिस, कुष्ठरोग, डेंग्यू, चिकुनगुनिया, ट्रॅकनकुलियासिस, इचिनोकोकोसिस, निद्रानाश, लेशमॅनियासिस, हत्तीरोग, ऑन्कोसेरसिआसिस. जागतिक स्तरावर १ अब्जाहून अधिक लोक या रोगाने प्रभावित होतात, अशी माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) 'एनटीडी' आजाराच्या उच्चाटनासाठी सर्वांना एकत्र येण्याचे, कृती करण्याचे आवाहन केले आहे. डॉ. मेश्राम यांनी सांगितले, जागतिक आरोग्य कार्यक्रमात 'एनटीडी' आजाराचे स्थान नाही. गरीब लोकांचे रोग म्हणूनही याकडे पाहिले जाते.
त्यामुळे गरिबीचे चक्र मोडून सर्व लोकांना न्याय, आरोग्य सेवा देण्याचे आवाहनही डॉ. मेश्राम यांनी केले. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे माजी अध्यक्ष प्रा. शरद शाकीर म्हणाले, यापैकी बरेच रोग टाळता येण्याजोगे आहेत आणि त्यामुळे जनजागृती महत्त्वाची आहे.
कुष्ठरोगाचे दरवर्षी १० हजार नवे रुग्ण
कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे होणारा एक जुना संसर्गजन्य रोग आहे. या रोगामुळे त्वचा आणि परिधीय नसा प्रभावित होतात. भारत आणि ब्राझील या देशांमध्ये याचे सर्वाधिक रुग्ण दिसून येतात. दरवर्षी सुमारे १० हजार नवीन रुग्ण नोंदवले जातात. या रोगाची जनजागृती, उपचार व गैरसमज टाळण्यासाठी महारोगी सेवा समिती महत्त्वाचे काम करीत आहे.
५० लाख लोकांना दरवर्षी 'सिस्टीरकोसिस' चा संसर्ग
इंडियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीच्या अध्यक्षा डॉ. संगीता रावत यांनी सांगितले, न्यूरोसिस्टीरकोसिस हा आजार टेनिया सोलियम म्हणजे फीत जंतांच्या अळ्यांपासून होतो. मेंदूमध्ये सिस्टीसरकोसिसच्या अळ्या जाणे हे मिरगी येण्याचे महत्त्वाचे कारण आहे. हा आजार प्रामुख्याने लॅटिन अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत आढळतो. या देशांतील ३० टक्के मिरगीचे झटके सिस्टीसरकोसिसमुळे येतात. दरवर्षी जगात ५० लाख लोकांना हा संसर्ग होतो आणि ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. जिथे डुकराची संख्या अधिक असते किंवा डुकरांचा मुक्त संचार असतो अशा गावखेड्यात या आजाराचे प्रमाण अधिक आहे.