कार्यालय फोडून थेट १० लाख रोख असलेली तिजोरीच पळविली

By योगेश पांडे | Updated: February 27, 2023 21:00 IST2023-02-27T21:00:12+5:302023-02-27T21:00:20+5:30

पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

office was broken and safe containing 10 lakh cash was stolen | कार्यालय फोडून थेट १० लाख रोख असलेली तिजोरीच पळविली

कार्यालय फोडून थेट १० लाख रोख असलेली तिजोरीच पळविली

नागपूर : कार्यालय फोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांकडून लाकडी आलमारीतील तिजोरी उघडत नव्हती. शेवटी चोरट्यांनी थेट १० लाख रोख असलेली तिजोरीच घेऊन पळ काढला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

प्रकाश रामदास कोहळे (४७) यांचे नेहरू नगर येथील ईटनकर भवनात पी.आर.ट्रेडर्स हे कार्यालय आहे. ते डिस्ट्रीब्युटर्स असून अनेकदा कार्यालयात रोख असते. २५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यालयात काम करणारे राहुल मांगलकर यांनी सायंकाळी साडेसात वाजता कुलूप लावले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी लोखंडी चॅनेल गेटदेखील तोडले व लाकडी आलमारीचे कुलूप तोडण्यातदेखील ते यशस्वी झाले. मात्र आलमारीमध्ये लोखंडाची तिजोरी होती व ती काही केल्या उघडत नव्हती. त्यात १०.३८ लाख रुपये रोख होती. अखेर चोरट्यांनी ती तिजोरीच घेऊन पळ काढला. हा प्रकार उघडकीस आल्यावर कोहळे यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: office was broken and safe containing 10 lakh cash was stolen

टॅग्स :nagpurनागपूर