आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर; ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 07:06 IST2025-10-11T06:06:18+5:302025-10-11T07:06:53+5:30
नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा : उपराजधानी झाली जाम, ‘आरक्षण बचाव’च्या घोषणा देत व्यक्त केली खदखद, २ सप्टेंबरचा तो शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी

आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर; ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महायुती सरकारने २ सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाजात किती प्रचंड खदखद आहे, याचे प्रत्यंतर शुक्रवारी येथे ओबीसी बांधवांनी काढलेल्या आरक्षण बचाव महामोर्चात पहायला मिळाले. ये तो सिर्फ झाँकी है... ओबीसींकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईच नव्हे तर पुणे, ठाणे जाम करू, असा इशारा या मोर्चातून देण्यात आला.
मोर्चात विदर्भासह राज्यभरातून हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले. यामुळे नागपूर शहर पूर्णत: जाम झाले होते. राज्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने यशवंत स्टेडियम येथून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. जय ओबीसी, जय संविधान, ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे, अशा घोषणा देत मोर्चा पंचशील चौक, व्हेरायटी चौक येथून संविधान चौकात आला. त्यानंतर सभा झाली. यावेळी विविध नेत्यांनी भाषणात २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी केली.
या मोर्चात प्रशांत पडोळे, प्रतिभा धानोरकर, श्यामकुमार बर्वे हे खासदार तसेच आमदार अभिजित वंजारी, आ. विकास ठाकरे, आ. रामदास मसराम, बाळासाहेब मांगरुळकर, शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख, माजी आमदार सुनील केदार, माणिकराव ठाकरे, रासपचे महादेव जानकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, रवींद्र दरेकर, उमेश कोरराम, कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे आदी सहभागी झाले होते.
वडेट्टीवार भुजबळांच्या आहारी गेले, जरांगे यांची टीका
वडीगोद्री (जि. जालना) : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे छगन भुजबळांच्या पूर्णपणे आहारी गेले असून, त्यांचे सर्व बोल भुजबळांचेच असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही, तोपर्यंत ते गप्प बसणार नाहीत, असा पलटवार त्यांनी केला.
नागपुरात झालेल्या ओबीसींच्या मोर्चानंतर वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले की, वडेट्टीवार चांगला माणूस होता, विरोधी पक्षनेता होता; पण आता तो नाशिकच्या षड्यंत्रात गुंतला आहे.
नागपूरधील मोर्चा राजकीय स्वार्थासाठी होता. तो काँग्रेस पक्षाचा मोर्चा होता. तो राहुल गांधींच्या सांगण्यावरून झाल्याचे जरांगे म्हणाले. अनिल देशमुख यांच्यासारख्या नेत्यांमुळे शरद पवारांच्या प्रतिमेला डाग लागतो. सध्या विविध राजकीय पक्षांकडून ओबीसींना खेचण्यासाठी प्रयोग सुरू आहेत, त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्येच स्पर्धा लागल्याचे जरांगे म्हणाले.
‘तेलंगणाप्रमाणे आरक्षण द्या’ : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, एकीकडे सरकार म्हणत आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि दुसरीकडे घुसखोरी होत आहे. तेलंगणा सरकारप्रमाणे ४२% आरक्षण द्या.