The number of Shiv Bhojan centers will increase in Nagpur | नागपुरात शिवभोजन केंद्रांची संख्या वाढणार

नागपुरात शिवभोजन केंद्रांची संख्या वाढणार

ठळक मुद्देसर्वच केंद्रांवर वाढीव उद्दिष्टांची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजनेस शहरातील सर्व केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद पाहता शहरातील केंद्रसंख्या वाढवण्यात येणार आहे. केंद्राची ठिकाणे निश्चित करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे एक बैठकही होणार असल्याचे सांगितले जाते.
राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजूला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना गेल्या २६ जानेवारीपासून राज्यभरात सुरू झाली. शहरात डागा रुग्णालय, गणेशपेठ बसस्थानक, गणेश भोजनालय बसस्थानक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल येथेही दोन ठिकाणी, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दोन ठिकाणी, मातृसेवा संघ हॉस्पिटल येथे दोन ठिकाणी अशा या नऊ ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी १० रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध आहे. शहरात दररोज ७५० लोकांनाच या थाळीचा लाभ घेता येत होता. या ठिकाणी दिलेले उद्दिष्टही होत होते. त्यामुळे गेल्या १९ फेब्रुवारीपासून या ठिकाणी २५ थाळी प्रत्येक ठिकाणी वाढवून देण्यात आली आहे. हेही उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे व शहरातील मागणी लक्षात घेता शासकीय रुग्णालय, रेल्वेस्थानकासह इतर ठिकाणी नवीन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. याबाबत प्राप्त प्रस्तावांचा विचार करून लवकरच ठिकाण निश्चित करण्यात येतील. त्यानुसार नवीन शिवभोजन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

Web Title: The number of Shiv Bhojan centers will increase in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.