पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मध्यरात्री नग्नपूजा, तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; भोंदूबाबासह पाच जणांना अटक
By योगेश पांडे | Updated: April 24, 2025 02:25 IST2025-04-24T02:23:09+5:302025-04-24T02:25:01+5:30
मोठे सेक्स रॅकेट असण्याची शक्यता...

पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मध्यरात्री नग्नपूजा, तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; भोंदूबाबासह पाच जणांना अटक
नागपूर : पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली एका भोंदूबाबाने मध्यरात्री नग्नपूजेचे नाटक केले. त्यादरम्यान तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे. त्यात एका महिलेचादेखील समावेश आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी या प्रकरणात गुप्तता राखली असून आरोपींची नावे उघड करण्यासदेखील अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
तीन दिवसांअगोदर हा प्रकार घडला. यात भोंदूबाबा असलेला कदीलबाबा हा मुख्य आरोपी आहे. कदीलबाबाचे मूळ नाव अब्दुल कादीर असून तो मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तर आशिष नावाचा आरोपी हा कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. त्याच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहणारी महिलादेखील यात आरोपी आहे. आशिष व संबंधित महिलेने शॉर्टकट पद्धतीने पैसे मिळविण्यासाठी कदीलबाबाला संपर्क केला. जर मध्यरात्री नग्नपूजा केली तर पैशांचा पाऊस पडेल व रात्रभरात मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील, असा कदीलबाबाने दावा केला. मात्र नग्नपूजेसाठी अल्पवयीन मुली लागतील, असे त्याने सांगितले.
आशिष व महिलेने दोन साथीदारांच्या मदतीने अल्पवयीन मुलींचा शोध सुरू केला. या चारही आरोपींनी गरीब घरातील तीन अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून पूजेसाठी तयार केले. सुरुवातीला केवळ काही कपडे काढावे लागतील अशीच आरोपींनी बतावणी केली होती. पैशांची गरज असल्याने तीनही मुली तयार झाल्या. रविवारी रात्री मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कदीलबाबाच्या घरी सगळे पोहोचले. मध्यरात्री कदीलबाबाने पूजेचे ढोंग सुरू केले. त्यादरम्यान त्याने बहुदा मुलींना गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याने तिघींवरही अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार समोर आल्यावर मुली हादरल्या. पैशांचा पाऊस करण्याची बतावणी ढोंग असल्याची बाबदेखील स्पष्ट झाली. मुलींनी त्यांच्या एका परिचित तरुणाला हा प्रकार सांगितला. तो त्यांना घेऊन मानकापूर पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी या प्रकरणात लगेच गुन्हा दाखल केला व अब्दुल कादीर-आशिषसह पाचही आरोपींना अटक केली आहे.
कदीलबाबाकडून अत्याचाराचे रॅकेट?
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अतिशय गुप्तता बाळगली आहे. कदीलबाबाने या अगोदरदेखील असा प्रकार केला आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील इतर दोन आरोपींची मुलींचा शोध घेण्यासाठी मदत घेण्यात आली होती. मात्र अंधश्रद्धेचा फायदा उचलत कदीलबाबा व आशिषने अगोदरदेखील असे प्रकार केले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात काहीही बोलण्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी नकार दिला.
पाचही आरोपींना पोलिस कोठडी
पाचही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले व न्यायालयाने त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तीनही मुली अल्पवयीन असल्याने प्रकरण संवेदनशील झाले आहे. या अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करण्यात आले आहे का याचादेखील पोलिस तपास करत आहेत.