आता मिळणार चष्म्यापासून मुक्ती
By Admin | Updated: March 31, 2017 02:57 IST2017-03-31T02:57:01+5:302017-03-31T02:57:01+5:30
लहानांपासून ते वयोवृद्धांना दूरचे किंवा जवळचे नीट दिसत नसेल, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतरही अंधुक दिसत असेल,

आता मिळणार चष्म्यापासून मुक्ती
मेडिकलमध्ये आले चार कोटींचे ‘लॅसिक लेझर’ : भारतातील पहिले अद्ययावत उपकरण
नागपूर : लहानांपासून ते वयोवृद्धांना दूरचे किंवा जवळचे नीट दिसत नसेल, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतरही अंधुक दिसत असेल, जाड चष्माच्या भिंगामुळे लग्न जुळत नसेल किंवा नोकरीत अडचण जात असेल अशा सर्वांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार करण्यासाठी ‘लॅसिक लेझर’ उपकरण महत्त्वाचे ठरते. राज्यात हे उपकरण केवळ मुंबईच्या शासकीय रुग्णालय जे.जे. येथेच आहे. आता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेडिकल) हे उपकरण उपलब्ध झाल्याने अनेकांना चष्म्यापासून मुक्ती मिळणार आहे. विशेष म्हणजे, देशातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या या उपकरणांपेक्षा कित्येक पटीने अद्ययावत असलेले हे पहिले उपकरण ठरले आहे.
‘लोकमत’ने ६ मार्च २०१६ रोजी ‘लालफितीत अडकले ‘लॅसिक लेझर’ उपकरण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरतेने दखल घेऊन त्याचा पाठपुरावा केल्याने अखेर गुरुवारी हे उपकरण मेडिकलमध्ये दाखल झाले.
चष्मा लागलेल्या व्यक्तींना चष्म्याशिवाय सर्व गोष्टी अंधुक अंधुक दिसतात. एखाद्यावेळी चष्मा कधी चुकून विसरल्यावर किंवा फुटल्यावर नवा चष्मा तयार होईपर्यंत होणारा खोळंबा हा देखील मनस्ताप देणारा ठरतो. यावर ‘लॅसिक लेझर’ उपकरणाद्वारे लेझर शस्त्रक्रिया महत्त्वाची ठरते. लहान वयापासून ते अगदी पन्नाशी पार केलेल्यांच्या डोळ्यावर ही शस्त्रक्रिया करून चष्म्यापासून मुक्ती मिळवता येते. पाच मिनिटांच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला आयुष्यात पुढे कधीही चष्मा लावण्याची गरज पडत नाही. याशिवाय सकाळी शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुपारी रुग्णाला रुग्णायलातून सुटीही देण्यात येते. राज्यात ही उपचारपद्धत केवळ मुंबईच्या शासकीय रुग्णालय जे.जे. येथेच आहे. सामान्यांना येथे जाणे-येणे करून उपचार घेण्याचा खर्च परडवणारे नसल्याने या उपकरणासाठी मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी पुढाकार घेतला. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी याचा पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आॅगस्ट २०१६ रोजी ‘इनोव्हेशन टेक्नालॉजी’ या विशेष निधीतून हे उपकरण खरेदीसाठी तत्काळ चार कोटी रुपये दिले.
विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची दखल घेतली. परंतु निधी असताना व नोव्हेंबर महिन्यात निविदा निघाल्या असतानाही लालफितीत खरेदी प्रक्रिया अडकली. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. अखेर हे उपकरण रुग्णालयात दाखल झाले.(प्रतिनिधी)
आठ हजारात होणार शस्त्रक्रिया
खासगी रुग्णालयात ‘लॅसिक लेझर’ शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे ४० ते ५० हजार रुपयांच्या घरात आहे. सर्वसामान्य रुग्णांना हा खर्च परडवणारा नाही. यामुळे अनेक रुग्ण मेडिकलमध्ये या शस्त्रक्रियेची विचारपूस करायचे. आता हे उपकरण उपलब्ध झाल्याने लवकरच शस्त्रक्रियेला सुरुवात होईल. मात्र ही ‘कॉस्मेटीक’ शस्त्रक्रिया असल्याने रुग्णाला साधारण आठ हजार शुल्क मोजावे लागणार आहे.
१५ ते २० दिवसांत शस्त्रक्रियेला सुरुवात होईल
चष्म्यापासून मुक्ती मिळण्यासाठी हे उपकरण फारच महत्त्वाचे ठरणार आहे. नेत्र रोग विभागाच्या शस्त्रक्रिया गृहात हे उपकरण स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. साधारण १५-२० दिवसांत हे उपकरण रुग्णसेवेत असेल.
-डॉ. अशोक मदान
विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग, मेडिकल