मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी आता मोडीलिपी प्रशिक्षण
By आनंद डेकाटे | Updated: August 1, 2024 16:00 IST2024-08-01T15:58:58+5:302024-08-01T16:00:19+5:30
Nagpur : १५ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

Now Modilipi training for Maratha, Kunbi students
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे च्या वतीने मराठा-कुणबी लक्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता “सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प” २०२४-२५ योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. १५ ऑगस्टपर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.
या प्रशिक्षणांतर्गत सारथी पुणे विभागीय कार्यालयामार्फत १२ वी उत्तीर्ण २० विद्यार्थ्यांना सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील मोडीलिपी प्रशिक्षण संस्थेद्वारे ६० तास (२ महिने) ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासोबतच सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्रामार्फत कुठल्याही शाखेतील पदवीधर ५० विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शाहु महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राद्वारे ६ महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील मोडीलिपी प्रशिक्षण संस्थेद्वारे कुठल्याही शाखेतील पदवीधर ४० विद्यार्थ्यांना १ वर्ष कालावधीसाठी मोडीलिपी सर्टिफिकेट कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या मोडीलिपी प्रशिक्षणाबाबतची संपूर्ण माहिती, मार्गदर्शक तत्वे, ऑनलाईन अर्ज, अर्ज भरण्याकरिता सूचना व हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता आदींबाबत https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर लिंक १५ ऑगस्टपर्यंत उपलब्ध राहील. विभागीय कार्यालयास हार्ड कॉपी सादर करण्याची अंतिम मुदत २० ऑगस्ट आहे. या तारखेमध्ये बदल असल्यास सारथीच्या संकेतस्थळावर सूचित करण्यात येणार आहे. जास्तीत-जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.
पात्रता व विद्यावेतन
पुणे, कोल्हापूर व संभाजीनगर विद्यापीठ व जिल्हा मुख्यालयाच्या बाहेरील कागदपत्रांच्या छाणनीद्वारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना प्रति विद्यार्थी दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. उमेदवारांस पूर्वलक्षी प्रभावाने आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.