आता उद्योग उभारणे कठीण, एमआयडीसीने जमिनीची किंमत वाढवली; दरकपातीची उद्योजकांची मागणी
By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 13, 2024 21:32 IST2024-07-13T21:32:25+5:302024-07-13T21:32:43+5:30
जमिनीच्या किमतीसोबतच गुंतवणुकही वाढल्याने उद्योजकांना नव्याने उद्योग उभारणे कठीण झाले आहे.

आता उद्योग उभारणे कठीण, एमआयडीसीने जमिनीची किंमत वाढवली; दरकपातीची उद्योजकांची मागणी
नागपूर : विदर्भात औद्योगिक क्षेत्रात विकासाची गती कमीच आहे. त्यातच एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्रातील जमिनीची किंमत वाढल्याने उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जमिनीच्या किमतीसोबतच गुंतवणुकही वाढल्याने उद्योजकांना नव्याने उद्योग उभारणे कठीण झाले आहे.
हिंगण्यात ५४० तर बुटीबोरीत २५० रुपये चौ.मीटर भाव वाढले
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जमिनीची किंमत वाढविल्याने हिंगणामध्ये २,८४० रुपये चौरस मीटर, तर अतिरिक्त बुटीबोरी आणि बुटीबोरी टप्पा-२ मध्ये २ हजार रुपये चौरस मीटर भाव झाले आहेत. हिंगण्यात ५४० रुपये तर बुटीबोरीत २५० रुपये चौ.मीटर भाववाढ झाली. बुटीबोरी आणि नवीन बुटीबोरी हे औद्योगिक क्षेत्र उद्योजकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरावे म्हणून उद्योग संघटनांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जमिनीचे दर कमी करण्याची मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केले. सध्या बुटीबोरी आणि नवीन बुटीबोरीमध्ये जागा खरेदी करण्यासाठी कुणीही उद्योजक पुढे येत नसल्याचे उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. लहान उद्योजकांना आकर्षित करायचे असल्यास त्यांना कमी दरात जागा उपलब्ध करून द्याव्या लागतील.
विदर्भाच्या अन्य भागात २०० ते ७५० रुपये चौ.मीटर भाव
विदर्भातील अन्य जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रातील जमिनीची किंंमत २०० ते ५००-७५० रुपये चौ.मीटर आहे. गडचिरोलीमध्ये २०० रुपये, गोंदिया, २५० रुपये, चंद्रपूर २५० ते ५५०, भंडारा २५० ते ७९०, वर्धा ३०० ते ५०० रुपये, अमरावती ३०० ते १,५८० रुपये, अकोला ३०० ते ९०० रुपये, बुलढाणा ३०० ते ४००, यवतमाळ ३०० ते ४०० रुपये, वाशिममध्ये ३०० रुपये चौ.मीटर भाव आहे.