आता थेट फिरा सिंकदराबाद, पटना समर स्पेशल ट्रेनचा अवधी वाढला
By नरेश डोंगरे | Updated: August 13, 2023 20:20 IST2023-08-13T20:18:59+5:302023-08-13T20:20:02+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या प्रवाशांची सोय; बिलासपूर, रायपूर, दुर्ग आणि गोंदियातही थांबे

आता थेट फिरा सिंकदराबाद, पटना समर स्पेशल ट्रेनचा अवधी वाढला
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेली समर स्पेशल ट्रेन नंबर ०३२५३ / ०३२५६ पटना सिकंदराबाद पटना हिचा अवधी वाढविण्यात आला आहे. त्यानुसार आता ही ट्रेन २९ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.
उन्हाळ्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून पटना सिकंदराबाद पटना ही समर स्पेशल ट्रेन प्रत्येक सोमवार आणि बुधवार अशी आठवड्यातून दोन दिवस चालवली जात होती. ती ३० ऑगस्टपर्यंत चालविली जाणार, असे आधीच जाहिर करण्यात आले होते. मात्र, या रेल्वे मार्गावर असलेल्या नागपूरसह प्रत्येक रेल्वे स्थानकांवरून या रेल्वेगाडीत प्रवासी मोठ्या संख्येत चढत उतरत असल्याने या गाडीला आता ३० सप्टेंबरपर्यंत चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तशी माहितीही अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. नागपूरसह बिलासपूर, रायपूर, दुर्ग आणि गोंदियात या रेल्वेगाडीचे थांबे आहेत. त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या प्रवाशांची सोय होणार आहे.
ज्यांच्याकडे कन्फर्म तिकिट, तेच करू शकतात प्रवास
या विशेष गाडीत दोन एसएलआर, तीन सामान्य, १२ स्लीपर, चार एसी थ्री, दोन एसी-टू श्रेणीच्या कोचसहित एकूण २३ कोच आहेत. विशेष म्हणजे, ही गाडी पुर्णत: आरक्षित आहे. ज्यांच्याकडे कन्फर्म तिकिट आहे, असेच प्रवासी या गाडीत चढून प्रवास करू शकतात.