आता मेयोमध्येही लवकरच सुरू होणार हृदय, मेंदूरोगावर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:12 IST2025-01-14T13:10:35+5:302025-01-14T13:12:04+5:30

केंद्र शासनाकडे प्रस्ताव : सध्या मेडिकलला पाठवावे लागतात रुग्ण

Now a treatment for heart and brain diseases will soon be opened in Mayo | आता मेयोमध्येही लवकरच सुरू होणार हृदय, मेंदूरोगावर उपचार

Now a treatment for heart and brain diseases will soon be opened in Mayo

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
बैठी जीवनशैली, तंबाखूचे व्यसन, तणाव, अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव यामुळे हृदय व मेंदूरोगाचे रुग्ण वाढत आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) या दोन्ही आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण येतात; परंतु विशेषज्ञ नसल्याने या रुग्णांना मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठविण्याची वेळ येते. हे थांबविण्यासाठी हृदय व मेंदूरोग विभाग निर्माण करण्यासाठी मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे.


गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोमध्ये दिवसेंदिवस रुग्णांचा व्याप वाढत आहे. या रुग्णालयात आवश्यक उपचार, तातडीच्या व गंभीर स्वरूपातील शस्त्रक्रिया होत असल्या तरी सुपर स्पेशालिटी विभाग नाही. नागपुरात केवळ मेडिकलमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय व मेंदूरोग विभाग आहे; परंतु या दोन्ही विभागाची ओपीडी आठवड्यातून दोनच दिवस असल्याने व आकस्मिक विभाग नसल्याने रुग्ण अडचणीत येतात. मेयोमध्ये या आजाराचे जे गंभीर रुग्ण येतात त्यांना मेयोमध्येच उपचाराखाली ठेवून पुढील उपचारासाठी तेथील डॉक्टर सुपरच्या डॉक्टरांशी संपर्क साधतात; परंतु यात जाणारा वेळ व उपचारात होत असलेला उशीर लक्षात घेऊन अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी सुपर स्पेशालिटी विभागाचा प्रस्ताव तयार केला. 


३०-३० बेडचे असणार दोन विभाग 
डॉ. चव्हाण यांनी 'लोकमत'ला सांगितले, केंद्र शासन पुरस्कृत योजनेतून हृदय व मेंदू रोग विभाग सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. याला मंजुरी मिळाल्यास जवळपास १०० कोटी निधीतून ५०० बेड हॉस्पिटल इमारतीवर हे दोन विभाग सुरू केले जातील. विभागात प्रत्येकी २० बेडचा वॉर्ड व १० बेडचा आयसीयू असेल. मनुष्यबळ व आवश्यक यंत्रसामग्री उभी केली जाईल. इतरही सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्यासाठी भविष्यात स्वतंत्र इमारत उभारण्याचा प्रयत्न असेल.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली हिरवी झेंडी 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मेयो व मेडिकलच्या विकासकामांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी डॉ. चव्हाण यांनी रुग्णालयात हृदय व मेंदूच्या रुग्णांची वाढलेली संख्या याची माहिती देत त्यांना अद्ययावत उपचार देण्यासाठी हृदयरोग व मेंदूरोगासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याकडे लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवी झेंडी दिली. 

Web Title: Now a treatment for heart and brain diseases will soon be opened in Mayo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.