लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तहसील पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात ताजाबाद येथील कुख्यात गुन्हेगार सोहेल ऊर्फ भांजा याला अल्पवयीन साथीदारासह अटक केली. त्याला अटक केल्यावर चोरीचे तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
शेख सोहेल ऊर्फ भांजा शेख मुख्तार (१९), रा. यासीन प्लाॅट ताजबाग, याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. ७ डिसेंबर रोजी वाठोडा येथील पासर प्रकाश परमार मुलींसोबत इतवारीतील बोहरा गल्लीत खरेदी करायला गेल्या होत्या. यादरम्यान त्यांच्या पर्समधून मोबाइल व २५ हजार रुपये लंपास करण्यात आले. तहसील पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना या घटनेत भांजाचा हात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला कारने जात असताना पकडले. विचारपूस केल्यावर त्याने तीन अल्पवयीन साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याद्वारे १८ चोरीचे गुन्हेही उघडकीस आणले. त्याच्याजवळून कारसह ११.४३ लाखांचा माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पीआय जयेश भांडारकर, बळीराम परदेशी, हवालदार लक्ष्मण शेंडे, प्रमोद शनवारे, शैलेष दाबोळे, किशोर गरवारे, नजीर शेख, शंभू सिंह, पंकज डवरे, यशवंत डोंगरे, कृष्णा चव्हाण, गगन यादव आणि अश्विनी यांनी केली.