नागपूरच्या कुख्यात नव्वाला मिळाली जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:31 IST2018-01-25T00:30:15+5:302018-01-25T00:31:23+5:30
दक्षिण नागपुरातील चर्चित मारुती नव्वा याला फोनवर जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने दक्षिण नागपुरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. मारुतीने यासंदर्भात नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नागपूरच्या कुख्यात नव्वाला मिळाली जीवे मारण्याची धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण नागपुरातील चर्चित मारुती नव्वा याला फोनवर जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने दक्षिण नागपुरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. मारुतीने यासंदर्भात नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नव्वाच्या तक्रारीनुसार त्याला मंगळवारी रात्री पाचपावलीतील पवन मोरयानी आणि मानकापूर येथील करीम लाला याने फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी गिट्टीखदान येथील सुमित ठाकूरचे नाव घेऊन त्यालाही पाहून घेण्याची धमकी दिली. नव्वाने बुधवारी सकाळी नंदनवन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी पवन आणि करीम लालाविरुद्ध धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पवन मोमीनपुरा येथील इप्पा गँगशी जुळलेला आहे. या गँगने एक महिन्यापूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. या प्रकरणात पवनला अटक करण्यात आली होती. तो नुकताच जामिनावर सुटला आहे. या हल्ल्याचा सूत्रधार इप्पा आणि त्याच्या साथीदाराला पोलीस एक महिन्यानंतरही शोधू शकलेले नाही. करीम लाला हा मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वीच मानकापूर चौकात त्याच्या इशाऱ्यावरूनच हल्ला करण्यात आला होता. बोरगाव दिनशॉ फॅक्टरीजवळ गोळीबार करणाऱ्या पंकज धोटेलाही त्याचा आश्रय मिळालेला आहे. पंकजने ज्या युवकावर गोळीबार केला होता तो सुमित ठाकूरचा साथीदार होता. यामुळे गुन्हेगारी जगतात या नवीन धमकीमुळे खळबळ उडाली आहे. पवन मोरयानी व करीम लाला अनेक वर्षांपासून गुन्हेगारी जगतात सक्रिय आहेत. ते जुगार अड्डा चालवण्यासाठी चर्चेत असतात. यानंतरही पोलीस त्यांच्याविरुद्ध कारवाई करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.