नागपुरातील कुख्यात आंबेकरच्या घरची झाडाझडती,सापडले तीन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:15 IST2019-10-15T23:14:24+5:302019-10-15T23:15:31+5:30
एक कोटीची खंडणी मागणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर (वय ४९) याच्या इतवारीतील घरझडतीत पोलिसांना केवळ तीन लाख रुपये मिळाले.

नागपुरातील कुख्यात आंबेकरच्या घरची झाडाझडती,सापडले तीन लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुजरातमधील एका उद्योजकाला जमिनीच्या व्यवहारात फसवून त्यांच्याकडून पाच कोटी रुपये हडपल्यानंतर त्यांना पुन्हा एक कोटीची खंडणी मागणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर (वय ४९) याच्या इतवारीतील घरझडतीत पोलिसांना केवळ तीन लाख रुपये मिळाले. दरम्यान, या गुन्ह्यात सहभागी असलेला संतोषचा भाचा नीलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३४) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करून, त्याचाही १८ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.
गुजरातमधील उद्योजक जिगर पटेल यांना मुंबईत आऊटलेट सुरू करायचे होते. एका दलालाच्या माध्यमातून आंबेकरसोबत त्यांची ओळख झाल्यानंतर, मुंबईच्या मालाड परिसरात आंबेकरने पटेल यांना एक जागा दाखविली. ही आपलीच आहे, असे सांगत बनावट कागदपत्रेही दाखविली. त्या जागेचा १० कोटीत सौदा करून टोकन म्हणून आंबेकरने पाच कोटी रुपये घेतले. रक्कम घेतल्यानंतर १५ महिने होऊनही आंबेकर त्या जागेची विक्री करून द्यायला तयार नसल्यामुळे पटेल यांनी चौकशी केली असता, ती जागा दुसऱ्याच्या मालकीची असल्याचे आणि आंबेकरने साथीदारांच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे पटेल यांच्या लक्षात आले. त्यामुळे पटेल यांनी त्यांना आपले पाच कोटी परत मागितले. आंबेकरने त्यांना नागपुरात बोलवून सेंटर पॉईंटमध्ये मीटिंग केली. यावेळी आंबेकरने पटेल यांना पिस्तूल दाखवून ‘ते पाच कोटी आणि जागा विसरून जा. पुन्हा एक कोटी रुपये खंडणी दे, नाही तर जीवे ठार मारेन’, अशी धमकी दिल्याचे समजते. १२ ऑक्टोबरला पटेल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवली. त्यानुसार, सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेकरच्या मुसक्या बांधल्या. तो सध्या पोलीस कस्टडीत आहे. त्याच्याकडून तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संतोषचा भाचा नीलेश केदार याला सोमवारी रात्री ताब्यात घेतले. तत्पूर्वी संतोषच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्या घरात केवळ तीन लाख रुपये आढळले.
अंकलेश्वरहून मुंबईत पोहचली रोकड
जून २०१८ मध्ये पटेल यांना संतोषने पाच कोटी रुपये हवालाने मागवून घेतले होते. त्यानुसार, गुजरातच्या अंकलेश्वरमधून ही रोकड मुंबईत आली आणि संतोषने साथीदारांच्या माध्यमातून ती ताब्यात घेतली. ही रोकड त्याने कुठे दडवून ठेवली किंवा त्यातून काय खरेदी केले, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.
मुंबईतही दोघांना अटक
या गुन्ह्यात संतोषसोबत आणखी पाच ते सात आरोपी आहेत. त्यांची नावे संतोषने पोलिसांना सांगितली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे एक पथक दोन दिवसांपूर्वीच मुंबईत पोहचले. या पथकाने संतोषच्या दोन साथीदारांना मंगळवारी मुंबईत ताब्यात घेतले. त्यांना घेऊन पोलीस नागपूरकडे निघाले. बुधवारी पहाटेपर्यंत हे पथक नागपुरात पोहचणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.