कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना जारी : राज्यातील ५० वे अभयारण्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 10:02 PM2021-04-08T22:02:08+5:302021-04-09T00:04:43+5:30

Notification of Kanhargaon Sanctuary चंद्रपूर जिल्हयातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कन्हारगाव हे राज्यातील ५० वे अभयारण्य ठरले आहे.

Notification of Kanhargaon Sanctuary issued: 50th Sanctuary in the state | कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना जारी : राज्यातील ५० वे अभयारण्य 

कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना जारी : राज्यातील ५० वे अभयारण्य 

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मिळाली होती मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चंद्रपूर जिल्हयातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कन्हारगाव हे राज्यातील ५० वे अभयारण्य ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची गेल्या डिसेंबर महिन्यात बैठक झाली होती. यात हे अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली होती.

व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित होण्यासाठी आणि वनसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाने हा महत्वाकांक्षी निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. विदर्भ ही देशाची व्याघ्र राजधानी मानली जाते. वाघांचे सुरक्षित स्थलांतर होणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे याला शासनाने नेहमीच प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

असे आहे कन्हारगाव अभयारण्य

२६९ चौरस किलोमीटर क्षेत्रात कन्हारगाव अभयारण्य असेल. हे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या व्याघ्र भ्रमणमार्गाच्या महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमेला जोडणारा तसेच या राज्याच्या वनक्षेत्रास सलग असलेले वनक्षेत्र आहे. वाघांच्या भ्रमणमार्गांच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे.

येथे वाघ व इतर वन्यजीव मोठया प्रमाणात असल्याने वन्यजीवांच्या शिकारीसाठी ब्रिटिशांनी खास ‘शूटिंग ब्लॉक’ घोषित केले होते. पूर्वी इंग्रज अधिकारी, नंतरही बरेच राजे महाराजे शिकारीसाठी यायचे. या वनक्षेत्रातील कन्हारगांव, वामनपल्ली व देवई ही ब्रिटिशांचे ‘शुटींग ब्लाॅक’ आता राज्य शासनाच्या निसर्ग संवर्धनाच्या धोरणामुळे ‘अभयारण्य’ म्हणून ओळखले जातील.

२०१३ पासूनची मागणी पूर्ण

कन्हारगांव अभयारण्य घोषित झाल्याने २०१३ पासून पर्यावरण प्रेमींनी रेटलेली मागणी पूर्ण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने आश्रयस्थळे सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. त्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

Web Title: Notification of Kanhargaon Sanctuary issued: 50th Sanctuary in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.