५४ पदविका महाविद्यालयांना नोटीस
By Admin | Updated: May 12, 2014 00:56 IST2014-05-12T00:56:50+5:302014-05-12T00:56:50+5:30
नागपूर नियमांना धाब्यावर ठेवून पदविका अभ्यासक्रम संचालित करणार्या महाविद्यालयांना ‘एमएसबीटीई’ने( महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

५४ पदविका महाविद्यालयांना नोटीस
‘एमएसबीटीई’ची कारवाई : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उचलले पाऊल
आशीष दुबे - नागपूर नियमांना धाब्यावर ठेवून पदविका अभ्यासक्रम संचालित करणार्या महाविद्यालयांना ‘एमएसबीटीई’ने( महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यातील ९२ महाविद्यालयांना नोटीस जारी करण्यात आली असून नागपूर विभागातील ५४ महाविद्यालयांचा यात समावेश आहे. जर या महाविद्यालयांनी निर्धारित वेळेत नोटिसीला उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर बंदीची कुºहाड कोसळण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागातील ३४ तंत्रनिकेतन व औषधविज्ञानशास्त्र तसेच राज्य शासन व ‘एमएसबीईटी’द्वारे मान्यताप्राप्त २२ संस्थांचा समावेश आहे. ‘एमएसबीटीई’ने फेब्रुवारी व मार्च महिन्यात राज्यातील सर्व ‘एआयसीटीई’द्वारा (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन)मान्यताप्राप्त पदविका महाविद्यालयांचे निरीक्षण केले होते. सोबतच राज्य शासन व ‘एमएसबीटीई’द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालयांत निरीक्षण पथक पाठविण्यात आले होते. चौकशीनंतर निरीक्षण दलाने राज्यातील ९२ महाविद्यालयांची यादी तयार केली होती. या महाविद्यालयांत नियमांचे पालन होत नसल्याचे नमूद करण्यात आले होते. यानंतर या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. यासंदर्भात महाविद्यालयांना लवकरात लवकर त्रुटीपूर्तता अहवाल सादर करावा लागणार आहे. ‘एमएसबीटीई’चे उपसचिव आर.व्ही.येनकर यांनी या वृत्ताला होकार दिला आहे. जर महाविद्यालय ठराविक वेळेत त्रुटीपूर्तता अहवाल देण्यास अपयशी झाले तर त्यांना बंद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ज्या महाविद्यालयांना नोटीस बजाविण्यात आली आहे तेथे निरीक्षण पथकांना अनेक त्रुटी आढळल्या होत्या. महाविद्यालयांत पुरेसे शिक्षक नव्हते तर अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव होता. ‘एआयसीटीई’, ‘एमएसबीटीई’ व राज्य शासनाच्या मापदंडानुसार महाविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण होत नव्हता.