केवळ घोषणा नाही, सन्मानित जागा द्यावा; पीरिपाचे जयदीप कवाडे यांचा महायुतीला इशारा
By आनंद डेकाटे | Updated: June 1, 2025 21:04 IST2025-06-01T21:04:14+5:302025-06-01T21:04:30+5:30
रविभवनमध्ये आयोजित पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते

केवळ घोषणा नाही, सन्मानित जागा द्यावा; पीरिपाचे जयदीप कवाडे यांचा महायुतीला इशारा
नागपूर - आंबेडकरी जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी केवळ घोषणा पुरेशा नाहीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीने पीरिपाला सन्मानित व निर्णायक जागा द्यावा. तरच राज्यातील आंबेडकरवादी जनतेचा विश्वास टिकेल, अन्यथा ही चळवळ उभ्या राजकीय यंत्रणेला प्रश्न विचारू शकते, असा इशारा पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांनी महायुतीला दिला.
रविभवनमध्ये आयोजित पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जवळ येत असताना, संघटनात्मक बळकटी, प्रचार योजना आणि आंबेडकरी समाजाशी संवाद वाढविणे या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
निधी संकलनासाठी संवाद सत्र
बैठकीत संघटनात्मक विस्तार, युवकांचा सक्रिय सहभाग, गावपातळीवर जनजागृती मोहिमा, “संविधान घराघरात” ही कल्पना, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि युवा प्रशिक्षण शिबिरे यावरही चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता संपर्क यात्रा, सोशल मीडियावर हॅशटॅगच्या माध्यमातून जनप्रबोधन यावर चर्चा करण्यात आली. तसेच निधी संकलनासाठी ‘उद्योगपती संवाद सत्रे’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पीरिपाच्या महिला आघाडीच्या नेत्या प्रतिमाताई जयदीप कवाडे, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, शहर अध्यक्ष कैलाश बोम्बले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, राष्ट्रीय मजदूर सेना विदर्भ प्रदेशाध्यक्ष विजय पाटील, पूर्व विदर्भ महिला अध्यक्षा सुचिताताई कोटांगळे, हाजी अब्दुल आरीफ, विदर्भ प्रदेश संघटक अंकित धुपे, नागपूर ग्रामीण अध्यक्ष पलाश ठवरे, महाराष्ट्र ब्रिगेड सेना सुमित डोंगरे, नितीन गायकवाड, पूर्व विदर्भ महासचिव डैनी शामकुवर, नागपूर शहर उपाध्यक्ष शेख नाझिर, निलेश डुंबरे, अनंत पुरी, सुनील कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.