बँक व विमा कंपनीच्या नावाआड फसवणूक
By Admin | Updated: June 4, 2014 01:11 IST2014-06-04T01:11:55+5:302014-06-04T01:11:55+5:30
बँक आणि विमा कंपनीचे अधिकारी असल्याची बतावणी करून चार भामट्यांनी एका व्यक्तीला एक कोटीचे आमिष दाखवले. विमा कंपनीची पॉलिसी आणि बोगस चेक देऊन या भामट्यांनी ‘त्या’ व्यक्तीला पावणेआठ

बँक व विमा कंपनीच्या नावाआड फसवणूक
नागपूर : बँक आणि विमा कंपनीचे अधिकारी असल्याची बतावणी करून चार भामट्यांनी एका व्यक्तीला एक कोटीचे आमिष दाखवले. विमा कंपनीची पॉलिसी आणि बोगस चेक देऊन या भामट्यांनी ‘त्या’ व्यक्तीला पावणेआठ लाखांचा गंडा घातला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली.
राहुल शर्मा, विकास सिसोदिया, विजय देसाई आणि पंकज भाटिया अशी आरोपींची नावे आहेत. १३ सप्टेंबर २0१३ ला यातील एकाने ज्युलियन जॉय लिव्ह (वय ३९, रा. बालाजी मेन्शन अपार्टमेंट, महाराणा कॉलनी, अजनी) यांना फोन केला. तुम्ही एसबीआय बँकेचे प्रीमियर पॉलिसीधारक आहात. त्यामुळे तुम्हाला १ लाख ८२ हजार रुपये मिळतील. मात्र, त्याकरिता तुम्हाला आयएनजी वैश्य इन्शुरन्स कंपनीसोबत करार करून ४३,६२५ रुपयांची पॉलिसी काढावी लागेल, असे सांगितले. पॉलिसीची ही रक्कम ९0 दिवसांत परत मिळेल, असेही सांगितले. १ लाख ८२ हजार रुपये मिळणार असल्याचे गृहित धरून ज्युलियन यांनी या भामट्यांना पॉलिसी काढण्यास होकार दिला. ओळखपत्र आणि पत्त्याची कागदपत्रेही पाठवली. काही दिवसानंतर त्यांना रिलायन्स आणि आयएनजी वैश्यच्या दोन पॉलिसी पाठविल्या. त्याबदल्यात आधी १ लाख ५0 हजारांचा धनादेश घेतला; नंतर तो कॅन्सल करून दीड लाखांची रक्कम मागितली. ही रक्कम घेतल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून एक कोटी रुपये मिळणार, असे दुसरे आमिष दाखवले. विश्वास बसावा म्हणून २२ लाखांचा एक धनादेशही दिला. ज्युलियन यांनी तो बँकेत जमा केला असता बाऊन्स झाला. आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून ज्युलियन यांची दिशाभूल केली आणि त्यांच्याकडून गेल्या नऊ महिन्यात ७ लाख ७९ हजार ६७५ रुपये हडपले. स्वत:ला कंपनीचे अधिकारी सांगणारे हे भामटे प्रत्येक वेळी ज्युलियन यांना पैसे देण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे उकळत होते. त्यामुळे ज्युलियन यांना शंका आली. त्यांनी शहानिशा केली असता एसबीआय, रिलायन्स अथवा आयएनजीसोबत उपरोक्त भामट्यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ज्युलियन यांनी सोमवारी अजनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी राहुल शर्मा, विकास सिसोदिया, विजय देसाई आणि पंकज भाटिया या भामट्यांविरुद्ध कलम ४१९, ४२0 अन्वये गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)