कळमना बाजारपेठ बंद करण्याचे आदेश नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:55 IST2020-03-25T23:53:45+5:302020-03-25T23:55:04+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांनी दिली.

कळमना बाजारपेठ बंद करण्याचे आदेश नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांनी दिली.
बाजारात ग्राहकांची गर्दी कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व कामगारांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आल्याचे भुसारी म्हणाले.
या सर्व पार्श्वभूमीवर कळमना बाजाराचे व्यवहार काही दिवसासाठी बंद करण्याची मागणी विविध असोसिएशनकडून पुढे आली आहे, हे विशेष.
भुसारी म्हणाले, दररोज बाजाराची साफसफाई करण्यात येत आहे. सर्व बाजाराच्या असोसिएशनच्या बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना ग्राहकांची गर्दी कमी करण्याचे आणि स्वच्छता ठेवण्याची विनंती करण्यात येत आहे. पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत आहे. त्यानंतरही धान्य, भाजीपाला आणि फळे बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे ही चिंतेची बाब आहे. कलम १४४ नंतरही बाजारात ग्राहकांची होणारी गर्दी पाहता फळ बाजार बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि अडतिया असोसिएशनने स्वत:हून घेतला आहे. शहरातील किरकोळ विक्रेते फळांच्या खरेदीसाठी बाजारात येत नसल्याने फळे विकणार कुणाला, असा त्यांचा सवाल आहे. आम्ही बाजार सुरू ठेवण्यास सांगितला होता. पण अडतिया असोसिएशने स्वत:हून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशीच बाब भाजीपाला बाजाराशी संबंधित आहे. शहरातील सर्वच आठवडी बाजार बंद झाल्याने भाज्यांची विक्री कमी झाल्याची त्यांची ओरड आहे. त्याकरिता कृृषी उत्पन्न बाजार समितीचा नाईलाज आहे. सध्या भाजीपाला बाजार पहाटे ४ ते दुपारी १२ पर्यंत सुरू आहे. या असोसिएशनने शनिवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भुसारी म्हणाले, बाजाराची पाहणी करताना कलम १४४ चे गांभीर्य लोकांमध्ये दिसून येत नाही. लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारच्या संचारबंदीनंतर राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या आहेत. आवक कमी झाली आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात मिळाव्यात म्हणून शासनाने बाजार बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत.